सोलापूर सायक्लोथॉनमध्ये बार्शीच्या ‘आयर्नमॅन’ अमृत खेडकर यांचा डंका; पटकावला द्वितीय क्रमांक!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या “सायक्लोथॉन २०२६” स्पर्धेत बार्शी सायकलिंग क्लबच्या सायकलपटूंनी दमदार कामगिरी करत जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात पुन्हा एकदा आपला ठसा उमटवला आहे. ५० किलोमीटर गटात बार्शीचे सायकलपटू तथा आयर्नमॅन अमृत खेडकर यांनी अवघ्या १ तास ३२ मिनिटांत अंतर पूर्ण करून द्वितीय क्रमांक पटकावत बार्शीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
सायकलिंग संस्कृतीचा प्रसार, निरोगी जीवनशैलीचा संदेश आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर यासाठी सायकल रायडर्स सोलापूरच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. देशभरात अशा सायक्लोथॉन स्पर्धांना वाढता प्रतिसाद मिळत असून फिटनेस आणि पर्यावरणपूरक वाहतुकीबाबत जनजागृती करण्यासाठी त्या प्रभावी माध्यम ठरत आहेत.
यंदाच्या स्पर्धेत एकूण १७५ जणांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४० सायकलपटूंनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवला. सोनी कॉलेज परिसरातून स्पर्धेला सुरुवात झाली. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी आयोजकांनी वृक्षाला पाणी घालून स्पर्धेचे उद्घाटन केले. विविध वयोगटांतील आणि व्यवसायांतील सायकलपटूंनी उत्साहाने सहभाग घेतला. बार्शी सायकलिंग क्लबचे अमृत खेडकर, डॉ. कुमार जगताप, डॉ. नवदीप लोकरे, अमोल ताकभाते, रणजीत पाटील आणि लक्ष्मण नलवडे यांनी स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. सर्व सहभागींचा पदक देऊन गौरव करण्यात आला.
स्पर्धेतील सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते अमृत खेडकर यांच्या कामगिरीने. त्यांनी ५० किलोमीटरचे अंतर सरासरी ३२ किलोमीटर प्रतितास वेगाने पूर्ण केले. स्पर्धात्मक सायकलिंगमध्ये हा वेग उल्लेखनीय मानला जातो. अनेक राष्ट्रीय आणि प्रादेशिक स्पर्धांमध्ये सहभागी होत त्यांनी सातत्यपूर्ण कामगिरीची परंपरा कायम राखली आहे.
यापूर्वी अमृत खेडकर यांनी काश्मीर ते कन्याकुमारी हा देशव्यापी सायकलिंग प्रवास पूर्ण केला आहे. तसेच प्रतिष्ठेची आयर्नमॅन स्पर्धा पूर्ण करणारे सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पहिले कर्मचारी म्हणून त्यांची विशेष ओळख आहे. बीआरएमसारख्या लांब पल्ल्याच्या आणि अत्यंत आव्हानात्मक सायकलिंग स्पर्धाही त्यांनी यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. बार्शी सायकलिंग क्लबच्या या यशामुळे तालुक्यातील युवकांमध्ये सायकलिंगबाबत नव्याने उत्साह निर्माण झाला असून, नियमित व्यायाम, फिटनेस आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे तरुणांचा कल वाढण्यास मदत होणार असल्याची भावना क्रीडाप्रेमींनी व्यक्त केली.




