बार्शी तालुक्यात 3 टन प्रतिबंधित मांगूर माशांची तस्करी उघड, दोघांना अटक

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शासनाने बंदी घातलेल्या मांगूर माशांची मोठ्या प्रमाणात तस्करी करणाऱ्या दोघांना बार्शी तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सुमारे 3 टन म्हणजेच 3000 किलो जिवंत मांगूर मासे जप्त केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक अतूल कुलकर्णी यांच्या आदेशानुसार आगामी बकरी ईद व कायदा-सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर बार्शी तालुका पोलिसांकडून पेट्रोलींग व नाकाबंदी सुरू आहे. दि. 22 मे 2026 रोजी रात्री 2 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव रात्रगस्तीवर असताना बार्शी बायपासरोड, परांडा चौक, नागोबाचीवाडी येथे अशोक लिलँड टेम्पो नं. KA 52 B 4687 संशयास्पद स्थितीत थांबलेला दिसला.
टेम्पो चालकाची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणीअंती टेम्पोच्या मागे ताडपत्रीचा हौद करून त्यात पाण्यासह अंदाजे 3 टन जिवंत मांगूर मासे वाहतूक करत असल्याचे आढळले. मत्स्य व्यवसाय विभाग, सोलापूर यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर हे मासे भारतीय माशांच्या प्रजातीला व पर्यावरणाला धोकादायक असल्याने भारत सरकारने प्रतिबंधित केले असल्याचे स्पष्ट झाले.
या प्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 146/26 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 223, 275, 3(5) सह पर्यावरण संरक्षण कायदा 1986 चे कलम 15 व अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम 2006 चे कलम 59 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अतूल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सह पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पो.नि. महेश माने, पो.उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, पोहेकॉ धनराज केकाण, पोकॉ राहूल बोंदर, चापोकॉ शिवशंकर खराडे यांच्या पथकाने केली.




