वाढदिवसानिमित्त समाजसेवक दाम्पत्याला आर्थिक मदतीचा हात, लोकव्याख्यानकार विशाल गरड यांचा स्तुत्य उपक्रम.

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : लोकव्याख्यानकार प्रा.विशाल गरड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा आणि समाजाला नवा विचार देणारा उपक्रम राबवत समाजसेवक दाम्पत्याला आर्थिक मदत केली. गेल्या अनेक वर्षांपासून व्याख्यानातून मिळणाऱ्या मानधनातील काही हिस्सा विविध संस्था व गरजू व्यक्तींना मदत म्हणून देण्याची परंपरा त्यांनी जपली आहे. अनेक मदती गुप्तपणे केल्या असल्या तरी समाजासमोर आदर्श निर्माण व्हावा या हेतूने यावर्षीची मदत जाहीर करण्यात आली.
समाजसेवी संस्थांना अनेक दाते मदत करत असतात; मात्र संस्थेच्या माध्यमातून पूर्णवेळ समाजकार्य करणाऱ्या समाजसेवकांच्या वैयक्तिक अडचणींकडे फारसे लक्ष दिले जात नाही. अनेक समाजसेवक स्वतःच्या गरजा बाजूला ठेवून समाजातील रंजल्या-गांजल्यांसाठी काम करत असतात. संस्थेला मिळालेल्या निधीचा वैयक्तिक वापर न करता तो समाजकार्यासाठी खर्च करण्याची त्यांची भूमिका असते. त्यामुळे यंदा संस्थेला नव्हे, तर संस्था चालवणाऱ्या समाजसेवकाला मदत करण्याचा निर्धार प्रा.गरड यांनी केला.
प्रार्थना फाऊंडेशनच्या माध्यमातून मोरवंची (ता. सोलापूर) येथील वृद्धाश्रम आणि बालग्राममधे पूर्णवेळ समाजसेवा करणारे प्रसाद मोहिते व अनू मोहिते हे दाम्पत्य विद्यार्थी दशेपासून प्रा. गरड यांच्यासोबत कार्यरत आहे. स्वतःच्या आर्थिक अडचणींना सामोरे जात हे दाम्पत्य समाजासाठी झटत असल्याने त्यांना ही मदत देण्यात आली.
“ही केवळ आर्थिक मदत नसून एक सामाजिक विचार आहे. निस्वार्थ समाजसेवकांच्या वैयक्तिक आयुष्यालाही आधार मिळायला हवा. त्यांच्या मुलांना चांगले शिक्षण, कुटुंबाला वैद्यकीय सुविधा आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी मिळावी, हा या उपक्रमामागील उद्देश आहे,” असे प्रा. विशाल गरड यांनी सांगितले.
समाजातील इतर सक्षम व्यक्तींनीही अशा समाजसेवकांच्या पाठीशी उभे राहावे आणि या विचाराचे अनुकरण व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.




