बार्शी तालुक्यातील २१ गावांना दिलासा मिळणार; बार्शी उपसा सिंचन योजनेच्या पाण्याच्या नियोजनासाठी मुंबईत महत्त्वाची बैठक घेणार

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यातील सिंचनापासून वंचित असलेल्या गावांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी आहे. बार्शी उपसा सिंचन योजनेमधून बचत होणाऱ्या पाण्यातून तालुक्यातील २१ गावांना पाण्याचा लाभ मिळवून देण्यासाठी लवकरच शासन स्तरावर एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. याबाबतचे संकेत राज्याचे जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत.
आमदार राजाभाऊ राऊत यांनी नुकतीच मुंबई येथील विधानभवन येथे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली आणि त्यांना या संदर्भातील मागणीचे पत्र सुपूर्द केले.
बार्शी तालुक्यातील धोत्रे ते यावली या दरम्यान असलेली २१ गावे वर्षानुवर्षे पाण्याच्या समस्येचा आणि दुष्काळाचा सामना करत आहेत. या गावांना हक्काचे पाणी मिळावे यासाठी आमदार राजाभाऊ राऊत सातत्याने प्रयत्नशील आहेत. बार्शी उपसा सिंचन योजनेमधून बचत होणारे ०.६६ टी.एम.सी. पाणी या वंचित भागाला देण्याचे नियोजन आहे.
हे बचत झालेले पाणी तावडीच्या तळ्यात आणून, तिथून पुढे बंद पाईपलाईनद्वारे या २१ गावांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.
आमदार राजाभाऊ राऊत यांनी या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधत तातडीने शासन स्तरावर उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याची मागणी जलसंपदा मंत्र्यांकडे केली. या मागणीची दखल घेत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या योजनेला गती देण्यासाठी आणि तांत्रिक बाबींवर चर्चा करण्यासाठी लवकरच विशेष बैठक आयोजित करण्याचे सुतोवाच केले आहे.
बार्शी तालुक्यातील सिंचनापासून वंचित राहिलेला एकही भाग मागे पडणार नाही. धोत्रे ते यावली दरम्यानच्या २१ गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटण्यासाठी ०.६६ टी.एम.सी. पाणी बंद पाईपलाईनद्वारे देण्याच्या योजनेबाबत जलसंपदा मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून लवकरच यावर मंत्रालयात बैठक होईल. या बैठकीच्या आश्वासनामुळे बार्शी तालुक्यातील पाण्या पासून वंचीत भागातील शेतकऱ्यांमध्ये आणि ग्रामस्थांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, ही योजना मार्गी लागल्यास तालुक्याच्या पूर्व भागाचा पाण्याचा प्रश्न कायमचा मिटण्यास मदत होणार आहे.




