झेडपी अध्यक्षांच्या गावातच बोगस डॉक्टरच्या चुकीच्या उपचारांचा बळी; उपळाई (ठोंगे) येथे एकाच मृत्यू
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या बार्शी तालुक्यातील उपळाई (ठोंगे) गावातच बोगस डॉक्टरकडून करण्यात आलेल्या अयोग्य व चुकीच्या उपचारामुळे एका इसमाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ग्रामीण आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मृत व्यक्तीचे नाव तानाजी नरहरी सुतार (वय ५८) असे असून, प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बोगस डॉक्टरने केलेल्या अयोग्य व चुकीच्या उपचारांमुळे तानाजी सुतार यांची प्रकृती अधिकच खालावली. योग्य व प्रमाणित वैद्यकीय उपचार न मिळाल्याने अखेर त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या घटनेनंतर संतप्त नागरिकांनी संबंधितावर तातडीने व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, घटनेची गंभीर दखल घेत पानगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने संबंधित ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत मोठ्या प्रमाणावर औषधे व वैद्यकीय साहित्य जप्त करण्यात आले आहे. आरोग्य प्रशासनाकडून सदर घटनेची सखोल चौकशी व अंतिम अहवालानंतर संबंधित बोगस डॉक्टरवर कायदेशीर कारवाईसाठी वैद्यकीय अधिकारी डॉ. महेश पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांमार्फत संशयित बोगस डॉ. शंकर मनोहर पाठक यांच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
बिनपरवाना डॉक्टरांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर
या घटनेमुळे ग्रामीण भागात बिनपरवाना वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. अशा बोगस डॉक्टरांमुळे नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचे चित्र समोर येत असून प्रशासनाने कठोर नियंत्रण ठेवण्याची मागणी जोर धरत आहे.
आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह ?
जिल्हा परिषद अध्यक्षांच्या गावातच व तालुक्यात अशा प्रकारची घटना घडल्याने प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामीण भागातील वैद्यकीय सेवा व देखरेख व्यवस्था सक्षम आहे का ? असा सवाल नागरिकांकडून केला जात आहे.उपळाई (ठोंगे) येथील या घटनेने ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी पुन्हा एकदा उघड केल्या आहेत.





