शैक्षणिक शिबिरे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक : समाधान काटे

B1न्यूज मराठी नेटवर्क
पुणे : “प्रशालेत राबविण्यात येणारी विविध शैक्षणिक शिबिरे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात महत्वपूर्ण भूमिका बजावतात. याद्वारे बालवयात मुलांवर योग्य संस्कार, चांगल्या सवयी, तंत्रज्ञानाची माहिती आणि व्यक्तिमत्वाची जडणघडण होण्यास मदत होते असे प्रतिपादन छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष समाधान काटे यांनी केले. ते गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत आयोजित दोन दिवशीय शिवसंस्कार शिबिर उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते.
छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्था, महालक्ष्मी एव्हिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शिवसंस्कार’ शिबिर राबविण्यात आले. यामध्ये विद्यार्थ्यांना शिवकालीन ऐतिहासिक प्रसंग, कथा ऐकण्याची संधी मिळाली. या ऐतिहासिक प्रसंगाचे सादरीकरण शिक्षक उमाकांत शेळके यांनी केले. त्याचबरोबर स्ट्राॅ विमानापासुन ते ड्रोनपर्यत प्रात्यक्षिक पाहायची संधी मुलांना मिळाली.यावेळी महालक्ष्मी एव्हिएशनचे नंदकुमार सालके यांनी सादरीकरण केले.
व्याख्याते लक्ष्मण जाधव यांनी प्रशालेत विद्यार्थ्यांकरीता सातत्याने नवनवीन उपक्रम राबविले जात असल्याबद्दल शिक्षकांचे कौतुक केले. कार्यक्रमास महालक्ष्मी एव्हिएशनचे संचालक सुजीत शेंडकर यांचे सहकार्य लाभले. सदर शिबिर उपक्रमशील व तंत्रस्नेही शिक्षक रणजित बोत्रे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आले. मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी शिबिराचे नियोजन केले. सूत्रसंचालन दीप्ती भगत यांनी केले. शिबिर यशस्वी होण्यासाठी गीतांजली कांबळे मंदाकिनी बलकवडे, विशाल चव्हाण यांनी परिश्रम घेतले.




