‘माझा बाप’ या डॉ. राहुल पालके यांच्या कवितेतून वडिलांच्या संघर्षमय जीवनाचा प्रवास
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : वडिलांच्या त्याग, कष्ट आणि मायेचा भावपूर्ण आविष्कार मांडणारी कवी व लेखक डॉ. राहुल पालके यांची ‘माझा बाप’ ही कविता सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या कवितेत त्यांच्या वडिलांचे( भगवान बाबुराव पालके यांचे कष्ट आणि मुलांसाठी केलेला त्याग व समर्पण याचे अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत मांडणी आहे.
कवितेत उन्हाळा, पाऊस आणि कडाक्याची थंडी अशा प्रत्येक परिस्थितीत कष्ट करणाऱ्या वडिलांचे चित्र उभे राहते. स्वतःच्या अडचणींकडे दुर्लक्ष करून दुसऱ्यांना मदत करणारा आणि माणुसकी जपणारा बाप या कवितेत दिसून येतो. “उन्हाच्या झळांत, घामाच्या धारांत माणुसकीची छत्री धरून दुसऱ्याला सावली देणारा बाप” अशी प्रभावी प्रतिमा त्यांनी शब्दबद्ध केली आहे.
तसेच मुलगा मोठा होऊन प्राध्यापक झाला तरीही जीवनाचे खरे धडे देणारा बाप कधीच विसरत नाही, हा संदेशही कवितेतून व्यक्त होतो. बाप हा बाहेरून कठोर दिसत असला तरी आतून प्रेमळ असतो, हे “काटेरी फणसाचा गोड गर” आणि “चंदनाच्या सावलीसारखा शीतल” या रूपकांमधून प्रभावीपणे मांडले आहे.
कवितेच्या शेवटच्या ओळींतून कवीने बापाच्या दृष्टीतील विशालता अधोरेखित केली आहे. जमिनीपासून आकाशापर्यंतच्या विशाल अंतरालाचे भानही बापाच्या नजरेत सामावलेले असते, असा गहन अर्थ या कवितेतून व्यक्त होतो.
ही कविता केवळ एका व्यक्तीच्या वडिलांची कथा नसून, समाजातील प्रत्येक कष्टकरी बापाचे प्रतिनिधित्व करणारी असल्याचे साहित्यप्रेमींचे मत आहे.





