बार्शी तालुक्यात गॅस सिलेंडर तुटवडा नाही ; अफवांवर विश्वास ठेवू नये – तहसीलदार एफ. आर. शेख
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसील कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.
बार्शी तालुक्यात सध्या एकूण ८ गॅस एजन्सी कार्यरत असून त्या मार्फत नागरिकांना घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा केला जात आहे. यामध्ये इंडियन गॅस, भारत गॅस आणि एचपीसीएल या प्रमुख गॅस कंपन्यांचा समावेश आहे. घरगुती गॅस सिलेंडरचे वितरण करताना कंपनीकडून दिल्या जाणाऱ्या ओटीपी (OTP) पडताळणीची सक्ती करण्यात आली आहे. गॅस सिलेंडरचा गैरवापर होऊ नये आणि वितरणात पारदर्शकता राहावी, यासाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे.
दरम्यान, गॅस सिलेंडर वितरणावर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच काळाबाजार रोखण्यासाठी तहसील कार्यालयामार्फत तालुका स्तरावर दक्षता पथकाची स्थापना करण्यात आली आहे. या पथकाला गॅस एजन्सींची तपासणी करून दररोज होणाऱ्या गॅस सिलेंडरच्या आवक-जावक व्यवहारांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
तहसील प्रशासनाने नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, बार्शी तालुक्यात घरगुती गॅस सिलेंडरचा कोणताही तुटवडा भासणार नाही. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घबराट न करता गॅस सिलेंडरचा अतिरिक्त साठा करू नये. तसेच सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमांतून पसरविल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये. प्रशासनाकडून गॅस पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांनी संयम बाळगून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन तहसीलदार एफ. आर. शेख यांनी केले आहे.





