आरोग्यकोल्हापूरमहाराष्ट्र

गर्भाशयाचा कर्करोग प्रतिबंध लसीकरण व शालेय विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणीची मोहीम गतीने राबवा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश

मोहीम यशस्वी होण्यासाठी चोख नियोजन करा, वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य करणार

B1न्यूज मराठी नेटवर्क

शासकीय रुग्णालयांच्या वतीने मोफत डोळे तपासणी व कंपन्यांच्या सीएसआर मधून मोफत चष्मे उपलब्ध करुन देणार

कोल्हापूर : शाळेमध्ये शिकणाऱ्या व शाळाबाह्य अशा 10 ते 26 वयोगटातील मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोग (सर्व्हाईकल कॅन्सर) प्रतिबंधासाठी मागील शैक्षणिक वर्षात सुरु झालेली लसीकरणाची मोहीम गतीने राबवा. तसेच इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुला- मुलींच्या डोळे तपासणीची मोहीम हाती घ्या, यासाठी चोख नियोजन करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले. मुलींसाठी गर्भाशय मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम आणि इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या मुला- मुलींसाठी डोळे तपासणीची मोहीम राबविण्याबाबत मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बैठक घेण्यात आली.

यावेळी अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, राजर्षी शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सत्यवान मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध पिंपळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात, जिल्हा माता, बाल संगोपन अधिकारी डॉ. फारुक देसाई, तसेच आरोग्य व शालेय शिक्षण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. मंत्री श्री.मुश्रीफ म्हणाले, दृष्टीदोषाचे निदान प्राथमिक अवस्थेतच होण्यासाठी वेळेत डोळे तपासणी करुन घेणे आवश्यक आहे. यासाठी इयत्ता पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थी विद्यार्थिनींच्या डोळ्यांची तपासणी मोहीम हाती घ्या. या मोहिमेसाठी डोळ्यांच्या डॉक्टरांची बैठक घेऊन योग्य नियोजन करा, अशा सूचना देऊन डोळ्यांच्या तपासणीमध्ये दृष्टीदोष आढळणाऱ्या मुलांना कंपन्यांच्या सीएसआर निधी मधून मोफत चष्मे देण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या म्हणजेच 10 ते 26 वयोगटातील शाळांतील व शाळाबाह्य मुलींना त्यांच्या पालकांचे संमतीपत्र घेऊन गर्भाशय मुखाच्या कॅन्सर प्रतिबंधासाठीचे लसीकरण करुन घ्या. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे पुढे ढकलण्यात आलेली ही मोहीम लवकरात लवकर सुरु करावी. यासाठी शिक्षण विभागाने पालकांच्या बैठकांचे नियोजन करावे तर आरोग्य विभागाने पालक व विद्यार्थ्यांचे समुपदेशन करुन त्यांच्या शंकांचे निराकरण करावे. तसेच ही मोहीम पूर्ण झाल्यानंतर स्तनाच्या कर्करोगासाठीची तपासणी शोध मोहीम हाती घ्या. यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी दिले.

गर्भाशय कॅन्सर प्रतिबंधासाठी लसीकरण मोहीम व शालेय विद्यार्थ्यांच्या डोळे तपासणीच्या मोहीमेसाठी आरोग्य, शिक्षण व संबंधित विभागांनी नियोजन करण्याबाबत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button