बार्शी तालुक्यात वनविभागाची मोठी कारवाई; तांबेवाडी तांड्यात ३५ टन अवैध लाकूडसाठा जप्त!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील मौजे तांबेवाडी तांडा येथे वनविभागाने धडक कारवाई करत सुमारे ३० ते ३५ टन अवैध लाकूडसाठा जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, वनविभागाने १२ ते १३ शेतकऱ्यांवर ‘महाराष्ट्र वृक्षतोड (नियमन) अधिनियम १९६४’ अंतर्गत वन गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३ जून २०२६ रोजी वनविभागाला तांबेवाडी तांडा येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या मालकी क्षेत्रात आणि घराच्या परिसरात विनापरवाना वृक्षतोड केल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे वनविभागाच्या पथकाने तात्काळ सदर ठिकाणी छापा टाकला.
या छाप्यात शेतकऱ्यांनी कायदेशीर परवानगी न घेता लिंब, आंबा, चिंच यांसारख्या विविध प्रजातींच्या वृक्षांची बेकायदेशीर तोड करून साठवून ठेवलेला सुमारे ३० ते ३५ टन लाकडाचा साठा आढळून आला. वनविभागाने हा सर्व माल जप्त केला असून याप्रकरणी पुढील तपास वेगाने सुरू आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली धडक कारवाई
सदरची यशस्वी कारवाई सोलापूरचे उपवनसंरक्षक कुलराज सिंह आणि सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बार्शीचे वनपरिक्षेत्र अधिकारी एस. एस. बडे यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले.
या कारवाईत वनपाल डी. बी. शिदोडकर, ए. आर. पिरजादे, वनरक्षक बालाजी धुमाळ, सचिन पुरी, करामत अली शेख, सुलतान शेख, पूजा खेणे, वनमजूर आशा बी अन्सारी तसेच वाहन चालक सिद्धेश्वर जाधव आणि शाबाज मुल्ला यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
वनविभागाचे नागरिकांना आवाहन “अवैध वृक्षतोड, बेकायदेशीर लाकूड वाहतूक किंवा वन्यजीवांची शिकार करणे हा गंभीर वनगुन्हा आहे. कोणत्याही नागरिकाने अशा प्रकारची कृत्ये करू नयेत. आपल्या परिसरात असा कोणताही बेकायदेशीर प्रकार आढळून आल्यास तात्काळ वनविभागाशी संपर्क साधावा. वृक्षांचे संवर्धन आणि संरक्षण करणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असून, नागरिकांनी वनविभागाला सहकार्य करावे,” असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले आहे.




