जागतिकस्तरावर राज्यातील पर्यटन उद्योगालापुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धेच्या माध्यमातून चालना मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात होणाऱ्या वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेत विविध स्पर्धकांचा सहभाग,जागतिक क्रीडा कॅलेंडरमध्ये पुण्याचे नाव स्थापित होणार
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई, दि. ३ राज्य शासनाच्या सहकार्याने पुणे जिल्हा प्रशासन व सीएफआयच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुरच्या माध्यमातून वार्षिक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सायकलिंग स्पर्धेचे आयोजन अतिशय स्तुत्य उपक्रम असून पुण्याला प्रमुख पर्यटन आणि जागतिक क्रीडा केंद्र म्हणून प्रस्थापित करणे या भव्य स्पर्धेमुळे शक्य होणार आहे. पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर स्पर्धा येत्या तीन चार वर्षांत निश्चितचं जागतिकस्तरावर लोकप्रिय स्पर्धा ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले.
विधानभवन येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी पुणे आणि सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (सीएफ आय ) यांच्यात पुणे ग्रॅण्ड चॅलेंज टुर २०२६ च्या आयोजना साठी सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, मुख्य सचिव राजेश कुमार, सीएफ आयचे अध्यक्ष पंकज सिंघ, जनरल सेक्रेटरी महिंद्र पाल सिंघ यांच्या सह संबंधित अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.
पुणे जिल्ह्यासोबतच लगतच्या जिल्ह्यातील पर्यटन संस्कृती व साहसी खेळांसाठी (ADVENTURE SPORTS) पुरक वातावरण निर्मितीस चालना मिळेल. स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळून स्थानिक समुदायांसाठी रोजगार निर्मिती आणि पायाभूत सुविधांचा विकास यातुन साध्य होणार आहे.



