बार्शी शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडाकेबाज कारवाई… गावठी पिस्तूल व काडतुस बाळगणारा एक युवक जेरबंद…!
बार्शीत अवैध गावठी पिस्तूलासह युवक अटकेत; गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई (सोलापूर ग्रामीण)
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर परिसरात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका युवकास पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.
दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास राणी लक्ष्मीबाई उद्यान परिसर, सोलापूर रोड, बार्शी येथे गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर व त्यांच्या पथकाने संशयित रोहित संतोष मारकड (वय २१, रा. उपळाई (रमाळा), ता. कळंब, जि. धाराशिव; सध्या रा. चोरमोळे प्लॉट, बार्शी) यास ताब्यात घेतले.
पंचासमक्ष करण्यात आलेल्या अंगझडतीत आरोपीकडून एक गावठी बनावटीचे पिस्तूल (मॅगझीनसह) तसेच एक जिवंत काडतूस विनापरवाना आढळून आले. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ६८/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम, 1959 कलम ३, २५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 कलम १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर करीत आहेत.
नागरिकांना आवाहन :
अवैध शस्त्र बाळगणारे किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधावा. माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवण्यात येईल, असे पोलिसांनी कळविले आहे.





