मतदान दिवशी तालुक्यात प्रथमच मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाची व्यवस्था, तालुक्यातील 2,14,754 मतदारांसाठी 256 मतदान केंद्र,
बार्शी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यात होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी प्रशासनाची सर्वतोपरी तयारी पूर्ण झाली असून, शुक्रवार दि. ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मतदानासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली आहे.
बार्शी तालुक्यातील या निवडणुकीत एकूण २ लाख १४ हजार ७५४ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यांच्यासाठी २५६ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर १ केंद्राध्यक्ष, ३ मतदान अधिकारी, १ पोलीस कर्मचारी व १ शिपाई अशा सहा जणांची टीम तैनात असणार आहे. याशिवाय पंचायत समितीच्या प्रत्येक गणासाठी दोन अशा प्रकारे एकूण २४ झोनल ऑफिसर नेमण्यात आले असून, मतदान प्रक्रियेदरम्यान उद्भवणाऱ्या अडचणी व समस्यांचे तात्काळ निराकरण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
मतदान प्रक्रियेकरिता २८२ टिममधून एकूण १,६९२ कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार, हिंसाचार अथवा कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणाही सज्ज असल्याचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी स्पष्ट केले.
मतदान केंद्रांवर वृद्ध व दिव्यांग मतदारांसाठी व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व केंद्राध्यक्ष व मतदान अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. गुरुवार दि. ६ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यक साहित्याचे वाटप करण्यात येणार असून, सायंकाळी ४ ते ५ वाजेपर्यंत ते आपल्या-आपल्या मतदान केंद्रांवर मुक्कामासाठी रवाना होणार आहेत. बार्शी समाचारने ही बातमी सर्व प्रथम दिली आहे. मतदान केंद्रांवर पोहोचण्यासाठी ३७ बसेसची वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ६ व ७ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे.
मतदान दिवशी सकाळी ६.३० वाजता मॉक पोल घेण्यात येणार असून, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींना तो दाखविण्यात येईल. प्रत्यक्ष मतदानाची वेळ सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत असणार आहे.
निवडणुकीत पहिल्यांदाच थेट प्रक्षेपणाची व्यवस्था या निवडणुकीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे तालुक्यात प्रथमच काही मतदान केंद्रांवर थेट प्रक्षेपणाची (लाईव्ह फीड) व्यवस्था करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार, मागील निवडणुकांमध्ये घडलेल्या हिंसाचार, मशीन छेडछाड व बोगस मतदानाच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर १२ मतदान केंद्रांवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे मतदान प्रक्रियेचे थेट प्रक्षेपण तहसील कार्यालयातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये पाहता येणार आहे.
थेट प्रक्षेपणाची व्यवस्था असलेली मतदान केंद्र पुढीलप्रमाणे — नारी – ३, पिंपळगाव (धस) – २, खडकोणी – १, ताडसौंदणे – १, खांडवी – ३ व देवगाव – २ मतदान केंद्रांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून प्रशासनाची सतत नजर राहणार आहे.
मतदारांना तहसीलदारांचे आवाहन
तहसीलदार एफ. आर. शेख यांनी बार्शी तालुक्यातील सर्व मतदारांना आवाहन करताना सांगितले की, “जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदानाची टक्केवारी शंभर टक्क्यांपर्यंत नेण्याचा प्रयत्न करावा. कोणत्याही आमिषाला बळी न पडता निष्पक्ष, निर्भय व पारदर्शकपणे आपल्या पवित्र मतदानाचा हक्क बजावावा.”
दरम्यान, मतदान दिवशी आचारसंहितेचा भंग, हिंसाचार अथवा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी तालुक्यातील संपूर्ण पोलीस प्रशासन सज्ज असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांनी दिली.




