अहिल्यानगरमध्ये ५ ते ९ फेब्रुवारीदरम्यान ‘कृषीपर्व’ जिल्हा कृषी महोत्सव

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

अहिल्यानगर, दि.३ : कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद अहिल्यानगर व एक्सपो इंडियन ओशियन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ५ ते ९ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत नेमाने इस्टेट, केडगाव रोड येथे भव्य जिल्हा कृषी महोत्सव ‘कृषीपर्व’ व कृषी परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती, कृषी उत्पादनांचे प्रदर्शन व थेट खरेदी-विक्रीची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी दिली आहे.

या कार्यक्रमास विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, राज्याचे जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, प्रकल्प संचालक आत्मा तसेच प्रकल्प संचालक, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यांच्या समन्वयातून हा उपक्रम राबविला जात आहे.

महोत्सवात धान्य महोत्सव, खाद्य महोत्सव, कृषी प्रक्रिया उद्योगांचे प्रदर्शन, महिला बचत गटांनी तयार केलेली उत्पादने, कृषी यांत्रिकीकरण व निविष्ठांचे सुमारे पाचशे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यात जामखेडची ज्वारी, अकोलेचा सुवासिक इंद्रायणी तांदूळ, हातसडीचा तांदूळ, गावरान मटकी, गहू, कडधान्य, फळे व भाजीपाला यांसह विविध कृषी प्रक्रिया पदार्थांची विक्री व प्रदर्शन करण्यात येईल.

कृषी क्षेत्रातील आधुनिक बदल लक्षात घेता महोत्सवात कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स, इंटरनेट ऑफ थिंग्ज आधारित उपाययोजना व काटेकोर शेती याविषयी माहिती देणारे विशेष स्टॉल असणार आहेत. यासोबतच खाद्य महोत्सवाच्या माध्यमातून शिपी आमटी, शिंगोरी आमटी, मांडे, थालपीठ यांसह विविध पारंपरिक गावरान खाद्यपदार्थांचा आस्वाद नागरिकांना घेता येईल.

या महोत्सवाच्या कालावधीत आयोजित कृषी परिषदेअंतर्गत कृषी विभागाशी संबंधित अधिकारी व विषयतज्ज्ञांच्या उपस्थितीत मार्गदर्शनपर चर्चासत्रे व व्याख्याने आयोजित केली असून त्यातून शेतकऱ्यांना आधुनिक शेती, उत्पादनवाढ, कृषी प्रक्रिया उद्योग व बाजारपेठ व्यवस्थापनाबाबत सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे. जिल्ह्यातील शेतकरी, महिला बचत गट, कृषी उद्योजक, विद्यार्थी व नागरिकांनी या जिल्हा कृषी महोत्सवाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या