प्लास्टिक प्रतिबंधात्मक विशेष मोहीमांमध्ये 4 दिवसात 65हजार दंड वसूली व 18 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त
B1न्यूज मराठी नेटवर्क
मुंबई : केंद्रीय व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून प्राप्त सूचनांनुसार 22 ते 28 जानेवारी या कालावधीत एकल वापर प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात प्लास्टिक प्रतिबंधात्मक विशेष मोहीमा राबवून 65 हजार दंडात्मक रक्कम वसूली तसेच 18 किलो प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
22 जानेवारी 2026 पासून सर्व विभाग कार्यालय क्षेत्रात प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिक तपासणी मोहीम महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, अतिरिक्त आयुक्त श्री.सुनिल पवार व घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.अजय गडदे आणि परिमंडळ 1 विभागाचे उपआयुक्त श्री. सोमनाथ पोटरे व परिमंडळ 2 विभागाचे उपआयुक्त श्री. संजय शिंदे यांच्या नियंत्रणाखाली प्रभावीपणे राबविण्यात आली.
यामध्ये बेलापूर विभागात दोन व्यावसायिकांकडून रु. 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 1 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आला. नेरुळ विभागातही एका व्यावसायिकाकडून रु. 5 हजार दंडवसूली आणि 2 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा तसेच वाशी विभागात एका व्यावसायिकाकडून 5 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 1 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्याची जप्ती करण्यात आली.
तुर्भे विभागात दोन व्यावसायिकांकडून रु. 10 हजार दंडवसूली आणि 6 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्ती आणि कोपरखैरणे विभागात रु. 5 हजार दंड वसूली व 1 कि.ग्रॅ प्लास्टिक पिशव्यांची जप्ती करण्यात आली. घणसोली विभाग कार्यालयामार्फत चार व्यावसायिकांकडून रु. 20 हजार दंड वसूली आणि 7 कि.ग्रॅ प्लास्टिक पिशव्यांचा साठा तसेच परिमंडळ 2 च्या भरारी पथकामार्फत रु. 10 हजार दंडात्मक रक्कम वसूली आणि 1.5 कि.ग्रॅ. प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त करण्यात आलेला आहे.
प्लास्टिक पिशव्यांचा वापर नागरिकांकडून पूर्णपणे टाळला जावा याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत असून त्यासोबतच प्रोजेक्ट मुंबई संस्थेच्या सहयोगाने प्लास्टिकमुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तरी नागरिकांनी आपल्या दैनंदिन वापरातून प्लास्टिक पिशव्या व एकल वापर प्लास्टिकला हद्दपार करावे आणि कापडी पिशव्यांचा पर्याय स्विकारावा असे करण्यात येत आहे.




