लाभ बंद झालेल्या महिलांनी अंगणवाडी सेविकेकडे कागदपत्र सादर करावी, सेविकेकडे लाभ बंद झालेल्या महिलांची यादी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना
27 जानेवारी पासून कागदपत्र स्विकारण्सास सुरुवात
B1न्यूज मराठी नेटवर्क
वर्धा, दि.27 : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत ई-केवायसी करतांना चूकीचे पर्याय निवडल्याने लाभ बंद झालेल्या महिलांची यादी त्या-त्या गावातील अंगणवाडी सेविकांना उपलब्ध करून देण्यात आली आहे. लाभ बंद झालेल्या, यादीतील महिलांनी आपल्या अंगणवाडी सेविकेशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र व स्वयंघोषणापत्र सादर करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांशी योजनेची प्रभावी अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे. योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलेला आर्थिक लाभ देण्यासाठी पात्रता, अपात्रतेचे निकष निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार योजनेतील पात्र लाभार्थी महिलेला आधार संलग्न बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरद्वारे दरमहा आर्थिक लाभाची रक्कम अदा करण्यात येते.
डिसेंबर महिन्याअखेर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-केवायसी प्रक्रिया करण्यात आली आहे. सदर प्रक्रीया पुर्ण करतांना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडतांना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडल्या गेल्याने त्यांचा लाभ बंद झाल्याच्या बाबी निदर्शनास आल्या आहे.
योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र, अपात्र आहे याची पडताळणी होणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी दिनांक 22 जानेवारी रोजी बैठक घेवुन गावपातळीवर ई-केवायसी प्रक्रीयेमध्ये लाभ बंद झालेल्या महिला लाभार्थ्यांचे अर्ज स्विकारणे, तपासणी करण्याकरीता ग्रामीण भागामध्ये ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका तसेच शहरी भागामध्ये वॉर्ड ऑफिसर व अंगणवाडी सेविकांमार्फत योजनेतील निकषाच्या अनुषंगाने कार्यक्रम राबविण्याचे निर्देश दिले आहे.
त्यानुसार ई-केवायसी प्रक्रीयेमध्ये लाभ बंद झालेल्या महिलांची यादी त्यांच्या क्षेत्रातील, गावातील, शहरी भागातील अंगणवाडी सेविकांना प्रशासनाकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. या यादीतील लाभार्थी महिलांनी दि.27 जानेवारीपासून जवळच्या अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्र, स्वयंघोषणापत्र सादर करावे. महिलांनी तातडीने माहिती सादर केल्यास शासनास लवकरात लवकर माहिती सादर करता येईल, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांनी कळविलेले आहे.




