राजर्षि शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ
B1न्यूज मराठी नेटवर्क
गोंदिया : देशातील नामांकित शैक्षणिक संस्थामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2025-26 साठी विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात आले होते. तथापि शैक्षणिक संस्थामधील सन 2025-26 मधील प्रवेश प्रक्रीया अद्याप पूर्ण झालेली नाही. यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ देण्यात येत आहे.
वेबसाईटवरून अर्ज डाऊनलोड करून तो परिपूर्ण व आवश्यक कागदपत्रासह दि.30 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी 6.15 वाजेपर्यंत पोस्टाने किंवा समक्ष समाजकल्याण आयुक्तालय, 3 चर्च रोड, पुणे-411001 येथे सादर करावेत. अर्जाचा नमुना व अधिक सविस्तर माहितीसाठी www.maharashtra.gov.in (ताज्या घडामोडी) या संकेतस्थळाला भेट द्यावी.
राज्यातील अनुसूचित जातीच्या (नवबौध्दासहीत) 100 विद्यार्थ्यांना देशातील भारत सरकार मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या http://mhrd.gov.in/institutions या संकेतस्थळावरील मान्यता प्राप्त एआयआयएमएस (AIIMS), आयआयएम (IIM), आयआयटी (IIT), आयआयआयटीएस (IIITs), एनआटी (NIT), आयआयएससी (IISc), आयआयएसईआर (IISER) या शैक्षणिक संस्थांसह केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय संकेतस्थळावरील मान्यताप्राप्त नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अनुसूचित जाती/नवबौद्ध घटकातील विद्यार्थ्यासाठी राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना समाज कल्याण विभागाकडून राबविली जाते.
तरी गोंदिया जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी कळविले आहे.




