शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला सवलतीच्या प्रस्तावांना वाढीव मुदत 31 जानेवारी अंतीम मुदत
B1न्यूज मराठी नेटवर्क
अमरावती : शास्त्रीय कला, चित्रकला क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या आणि लोककला प्रकारात सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्याध्ययन सवलतीसाठी अतिरिक्त गुण देण्याची कार्यवाही शासन निर्णयानुसार शिक्षण मंडळामार्फत करण्यात येते. इयत्ता दहावीच्या माहे फेब्रुवारी-मार्च 2026 च्या परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे यासंबंधीचे प्रस्ताव माध्यमिक शाळांनी विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी 31 जानेवारी 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याची सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन पुणे राज्यमंडळाचे सचिव दीपक माळी यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.
यापूर्वी शासन निर्णयानुसार सदर विषयासंबंधीचे प्रस्ताव विद्यार्थ्यांनी संबंधित माध्यमिक शाळेकडे 15 डिसेंबरपर्यंत व शाळांनी ते प्रस्ताव विभागीय मंडळाकडे 15 जानेवारीपर्यंत सादर करण्याबाबत सूचीत करण्यात आले होते. तथापि, महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई यांनी पत्रान्वये कळविल्यानुसार, शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा 2025 चा निकाल जानेवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात जाहीर होणार आहे. त्यामुळे शास्त्रीय कला, चित्रकला व लोककला विषयक प्रस्ताव वेळेत सादर करणे शक्य नसल्याने, या वर्षापुरती विशेष बाब म्हणून मुदतवाढ देण्यात आली आहे.
शाळांनी विभागीय मंडळांकडे प्रस्ताव सादर करण्याची अंतिम तारीख शासन निर्णयानुसार 15 जानेवारी होती तसेच सुधारित अंतिम तारीख ही आता 31 जानेवारी 2026 राहील. या मुदतवाढीचा लाभ संबंधित पात्र विद्यार्थ्यांना होणार असून, शाळा प्रशासनाने दिलेल्या वाढीव मुदतीत सर्व प्रस्ताव पूर्ण करून विभागीय मंडळाकडे सादर करावेत, असे आवाहन मंडळाव्दारे करण्यात आले आहे.




