बांधकाम कामगार नोंदणी व कल्याणकारी योजनांसाठी कोणतेही शुल्क नाही दलालांपासून सावध राहण्याचे आवाहन
B1न्यूज मराठी नेटवर्क
हिंगोली दि. 07 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ, मुंबई अंतर्गत जिल्हा कार्यालय, हिंगोली यांच्यामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणी व नूतनीकरणाची प्रक्रिया पूर्णतः मोफत करण्यात येते. यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. तसेच बांधकाम कामगारांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने देण्यात येतो. या लाभासाठीही कोणतेही शुल्क आकारण्यात येत नाही. नोंदणी, नूतनीकरण व योजनांचे लाभ देण्याची सर्व प्रक्रिया पूर्णतः ऑनलाईन प्रणालीद्वारे करण्यात येत असून, ही कामे कोणत्याही एजंट, दलाल, मध्यस्थ किंवा संघटनेच्या माध्यमातून केली जात नाहीत.
सर्व बांधकाम कामगारांनी या संदर्भात कोणीही व्यक्ती किंवा संस्था पैशाची, कमिशनची अथवा लाचेची मागणी केल्यास संबंधित बांधकाम कामगारांनी तात्काळ शासकीय कामगार अधिकारी, हिंगोली कार्यालय (दूरध्वनी क्र. 02456-299290) किंवा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली यांच्याकडे तक्रार करावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
तसेच नोंदणी, नूतनीकरण किंवा योजनांच्या लाभासाठी बांधकाम कामगारांनी दलाल, एजंट, मध्यस्थ किंवा कोणत्याही संघटनेच्या माध्यमातून फसवणूक झाल्यास, त्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, याची सर्व बांधकाम कामगारांनी नोंद घ्यावी, असेही जिल्हा कार्यालयामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.




