बार्शी शहर पोलिसांची दमदार कामगिरी४८ तासांत बेपत्ता अल्पवयीन मुलाचा सुखरूप शोध
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर पोलिसांनी तत्परता व कौशल्य दाखवत अवघ्या ४८ तासांत बेपत्ता झालेल्या १३ वर्षीय अल्पवयीन मुलाचा सुखरूप शोध घेऊन त्याला पालकांच्या ताब्यात दिल्याने सर्वत्र पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
बार्शी शहरातील टिळक चौक परिसरात राहणारे दशरथ शहाजी चव्हाण यांचा मुलगा श्रेयश दशरथ चव्हाण (वय १३ वर्षे) हा दिनांक २ जानेवारी २०२६ रोजी कोणालाही काही न सांगता घरातून निघून गेला होता. याप्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गु.र. नं. ०३/२०२६ भा.न.सं. कलम १३७(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी तात्काळ दखल घेत तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक झालटे व गुन्हे प्रकटीकरण पथकाला मुलाचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार बार्शी बस स्थानक, कुर्डुवाडी बस स्थानक तसेच पुणे रेल्वे स्टेशन येथील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करण्यात आले. तपासा दरम्यान मुलगा पुणे येथे गेल्याचे निष्पन्न झाले.
पोलीस पथकाने त्वरित पुणे येथे शोधकार्य सुरू करून दिनांक ४ जानेवारी २०२६ रोजी श्रेयश चव्हाण याचा सुखरूप शोध घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक . प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत सपोनि श्री. झालटे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील पोहेकॉ ठोंगे, केकाण, पो.कॉ. राहुल उदार, सतिश उघडे, बाळकृष्ण मुठाळ व वैभव भांगे यांनी मोलाची भूमिका बजावली.
बार्शी शहर पोलिसांच्या या तत्पर व प्रभावी कामगिरीमुळे अल्पवयीन मुलगा सुरक्षितपणे कुटुंबात परतला असून, नागरिकांमध्ये पोलिसांबद्दल विश्वास अधिक दृढ झाला आहे.




