नांगरापासून ते सत्तेपर्यत पुस्तकाचे मुख्यमंत्र्याच्या हस्ते प्रकाशन
डॉ. अवनीश पाटील , प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मचाले यांनी लिहलेल्या पुस्तकांचे प्रकाशन
B1न्यूज मराठी नेटवर्क
सातारा : शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील आणि इतिहास विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. दत्तात्रय मचाले यांनी लिहलेल्या ‘नांगरापासून सत्तेपर्यंत : सर धनजीशा कूपर (काळ आणि कर्तृत्व) या ग्रंथाचे प्रकाशन महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कूपर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष फरोख कूपर यांच्या हस्ते झाले.
थोडेसे ग्रंथाविषयी : सर धनजीशा कूपर यांनी साताऱ्यासारख्या ग्रामीण भागात ‘सातारा इंडस्ट्रीयल वर्क्स’ ची स्थापना करून एका औद्योगिक पर्वाची सुरुवात केली. १९१२ मध्ये साताऱ्याच्या नगरपालिकेतून सुरु झालेला त्यांचा प्रवास १९३७ मध्ये मुंबई प्रांताचे (ज्यामध्ये आजचा महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटकचा काही भाग समाविष्ट होता.) पहिले प्रधानमंत्री होण्यापर्यंत पोहचला.
सर कूपर हे जन्माने पारशी असूनही महाराष्ट्राच्या मातीशी आणि येथील बहुजन समाजाशी पूर्णपणे समरस झाले होते. रावबहाद्दूर रा. रा. काळे, कर्मवीर भाऊराव पाटील, प्रबोधनकार ठाकरे, स्वा. सावरकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी त्यांचा संबंध आला. त्यांनी घेतलेली सामाजिक न्यायाची भूमिका ही महाराष्ट्राच्या दैदिप्यमान वारशाचा एक अविभाज्य घटक बनली.
औद्योगिक क्षेत्रात कार्य करत असताना त्यांनी सुरवातीला शेतीपूरक अवजारे बनवली. त्यात ‘बहाद्दूर’ या नांगराची आणि डिझेल इंजिनची निर्मिती करून त्यांनी महाराष्ट्रात कृषी-औद्योगिक क्रांतीची मुहुर्तमेढ रोवली. विसाव्या शतकातील एक दूरदर्शी उद्योजक, समाजसुधारक आणि प्रभावी राजकारणी म्हणून त्यांचे व्यक्तिमत्त्व या ग्रंथातून उलगडते.
थोडेसे संशोधन प्रकल्पाविषयी : ‘सर धनजीशा कूपर : काळ आणि कर्तृत्व’ या संशोधन प्रकल्पाची सुरुवात जानेवारी २०२४ मध्ये झाली. या प्रकल्पाच्या सुकाणू समितीमध्ये शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागाचे माजी विभागप्रमुख प्रा. डॉ. अरुण भोसले सर, कूपर इंडस्ट्रीजचे मानव संसाधन अधिकारी नितीन देशपांडे, इतिहास विभागाचे विभागप्रमुख डॉ. अवनीश पाटील सर होते.
तसा कूपर इंडस्ट्रीज आणि शिवाजी विद्यापीठाचा इतिहास विभाग यांचा स्नेहबंध प्रा. डॉ. अरुण भोसले सर विभागप्रमुख असल्यापासूनचा म्हणजेच साधारणतः दोन दशकापूर्वीपासूनचा आहे. सर धनजीशा कूपर हा सरांचा जिव्हाळ्याचा विषय. त्यांनी सर धनजीशा कूपर यांच्यावर लिहलेली नोंद मराठी विश्वकोश निर्मिती मंडळामध्ये ऑनलाईन स्वरुपात प्रकाशित सुध्दा झालेली आहे.
त्यामुळे या प्रकल्पात त्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन झाले. त्याबद्दल सरांचे मन:पूर्वक आभार! या महत्त्वपूर्ण प्रकल्पात मला काम करण्याची संधी या समिती सदस्यांनी आणि माझे मार्गदर्शक डॉ. अवनीश पाटील सरांनी दिली, त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! नितीन देशपांडे सरांनी वेळोवेळी आम्हाला सर्व प्रकारचे सहकार्य केले.
त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! हा प्रकल्प पूर्णत्वास नेताना शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के सर, माजी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील सर, विद्यमान प्रभारी कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी सर, प्रभारी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव मॅडम, कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे व इतर विद्यापीठातील सर्व अधिकारी वर्ग यांनी वेळोवेळी सहकार्य केले त्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार! त्याचबरोबर कूपर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष फरोख कूपर यांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासाबद्दल त्यांचे मन: पूर्वक आभार!
सदर प्रकल्प पूर्ण करताना या प्रकल्पावर संशोधन सहाय्यक म्हणून काम पाहणाऱ्या श्रीमती वर्षाराणी पांढरे यांचेही मन:पूर्वक आभार! तसेच या प्रकल्पात नेहमी आमच्या सोबत असणारे नितीन गंगधर, अवधूत चव्हाण, संदिप केसरकर यांचेही आभार. सर धनजीशा कूपर यांचा जन्म २ जानेवारी १८७८ चा. आणि आजच म्हणजे २ जानेवारी २०२६ म्हणजेच त्यांच्या जयंतीदिवशीस ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात त्यांच्या चरित्रग्रंथाचे प्रकाशन होणे म्हणजे दुग्धशर्करा योगच! या ऐतिहासिक प्रकल्पासाठी प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या सर्वांचे पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार!




