सिद्धार्थ बसवंत यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी निवड, निता देव जिल्हाध्यक्ष, राजश्री गवळी जिल्हा उपाध्यक्ष, गणेश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष तर किरण माने यांची जिल्हा सहसचिव पदी निवड
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सोलापूर जिल्हा कार्यकारिणीची महत्त्वपूर्ण बैठक आज पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या बैठकीचे अध्यक्षस्थान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी भूषविले. बैठकीदरम्यान जिल्हा व तालुका पातळीवरील विविध पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या.
या बैठकीत व्हीएस मराठी न्यूजचे उपसंपादक सिद्धार्थ बसवंत यांची डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या बार्शी तालुका अध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली. पत्रकारितेतील त्यांचा अनुभव, सामाजिक बांधिलकी व डिजिटल माध्यमातील सक्रिय सहभाग लक्षात घेऊन ही निवड करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.
याच बैठकीत प्रवीण नागणे यांची पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, नागनाथ सुतार राज्य तांत्रिक सल्लागार, सचिन कुलकर्णी सोलापूर जिल्हाध्यक्ष, गणेश शिंदे जिल्हा उपाध्यक्ष, किरण माने जिल्हा सहसचिव, निता देव महिला आघाडी सोलापूर जिल्हाध्यक्ष तर राजश्री गवळी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
यावेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी डिजिटल माध्यमांचे वाढते महत्त्व अधोरेखित करत पत्रकारांच्या हक्कांसाठी, सुरक्षिततेसाठी आणि व्यावसायिक विकासासाठी संघटना सदैव कार्यरत राहील, असे सांगितले. नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून त्यांनी संघटनेच्या ध्येय-धोरणानुसार काम करण्याचे आवाहन केले. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे सोलापूर जिल्ह्यात डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे कार्य अधिक गतिमान होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या बैठकीस संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सतीश सावंत, राज्य संघटक मुरलीधर चव्हाण, राज्य कोषाध्यक्ष अमित इंगोले, राज्य प्रसिद्धी प्रमुख धिरज शेळके, संघटनेचे सल्लागार राजाराम मस्के यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील डिजिटल मीडियाचे संपादक, पत्रकार व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण नागणे यांनी केले आभार ह. भ. प. सूर्यराज महाराज भोसले यांनी मानले.




