ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतक-यांच्या पिकांची होणार ऑफलाईन पाहणी – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील
ई-पीक पाहणीसाठी समिती गठित
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर : राज्यातील खरीप हंगाम २०२५ मध्ये ज्या शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी विहीत मुदतीत नोंद झाली नाही, अशा शेतकऱ्यांसाठी शासनाने ऑफलाईन पिक पाहणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी दिनांक २४ डिसेंबर २०२५ पर्यंत आपआपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) यांच्याकडे अर्ज सादर करावेत असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले आहे.
ग्रामस्तरीय समितीकडून प्रत्यक्ष पाहणी प्रत्यक्ष करण्यात येणार असून, मंडल अधिकारी याचे अध्यक्ष असणार आहेत. या समितीमध्ये ग्राम महसूल अधिकारी, ग्राम विकास अधिकारी व सहाय्यक कृषी अधिकारी यांचा समावेश असणार आहे. ग्राम महसूल अधिकारी यांनी सदर अर्ज स्विकारुन त्यांची स्वतंत्र नोंदवहीत नोंद घ्यावी व संबंधित शेतक-यास पोहोच दयावी.प्राप्त अर्जाच्या अनुषंगाने ग्रामस्तरीय समितीने संयुक्तपणे संबंधित शेतक-यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी ही दिनांक 25 डिसेंबर 2025 ते 07 जानेवारी 2026 या कालावधीत करावी.सदर स्थळपाहणी करण्यापूर्वी समितीने स्थळपाहणीची दिनांक व वेळ निश्चित करुन त्यांची पूर्व कल्पना संबंधित शेतक-यांस शेताच्या बांधाला लागून असलेल्या किमान 4-5 शेतक-यांना लेखी स्वरुपात दयावी.
प्रत्यक्ष स्थळपाहणीच्या दिवशी खरीप हंगाम 2025 मध्ये प्रत्यक्षात शेतक-यांनी कोणत्या पिकाची लागवड केली होती त्यांची स्थानिक चौकशी करुन पीक नोंदणीच्या अनुषंगाने वस्तुस्थिती दर्शक पंचनामा करावा व शेताच्या बांधाला लागुन असलेले इतर शेतक-यांचे जाब जबाब नोंदविण्यात यावेत.
सदर पंचनाम्यात शेतक-यांने शेतात पीक लावण्यासाठी खरेदी केलेले बी-बियाणे, खते इत्यादी अनुषंगिक बाबींच्या खरेदी पावत्या तपासून त्याबाबत पंचनाम्यात नमूद करावे.मागील वर्षाच्या खरीप हंगामाची पिक पाहणींची नोंद तपासून नमूद करावी.
चौकशीअंती पिकांचे नाव व क्षेत्र पंचनाम्यात नमूद करावे. स्थळपाहणीचा अहवाल मंडळ अधिकारी यांनी शासन निर्णयाव्दारे उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीस गावनिहाय एकत्रित स्वरुपात दिनांक 12 जानेवारी 2026 पर्यंत सादर करावा.सदरच्या अहवालात खाते क्रमांक, खातेदाराचे नाव, गट कमांक, एकूण क्षेत्र, पिकांची नावे, पिकांचे क्षेत्र इत्यादी बाबी स्पष्टपणे नमूद कराव्यात. तसेच सदरच्या एकत्रित अवालावर सर्व समिती सदस्यांच्या स्वाक्ष-या असाव्यात.
उपविभागीय अधिकारी स्तरीय समितीने ग्रामस्तरीय समितीचा दररोज आढावा घ्यावा. ग्रामस्तरीय समितीकडून प्राप्त झालेले स्थळपाहणी अहवाल उपविभागीय अधिकारी स्तरीय समितीने तपासुन दिनांक 13 जानेवारी 2026 ते दिनांक 15 जानेवारी 2026 या कालावधीत जिल्हाधिकारी यांना सादर करावा तसेच ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाबाबत तक्रारी अथवा हरकती आले असता आवश्यकता असल्यास फेरचौकशी करावी. ग्रामस्तरीय समितीच्या कामकाजाच्या दरम्यान प्रत्यक्ष गाव भेटी देऊन कामकाजाचा आढावा घ्यावा. ज्या शेतक-यांची पीक नोंदणी गाव नमूना नं. 12 वर यापुर्वीच प्रतिबिंबीत झालेली आहे त्या पीक पाहणी मध्येदुरुस्ती केली जाणार नाही याची दक्षता या समितीने घ्यावी.
दि.17 डिसेंबर ते 24 डिसेंबर 2025 या कालावधीत शेतकरी यांनी ग्राम महसूल अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा .25 डिसेंबर 2025 ते 07 जानेवारी 2026 या कालावधीत ग्रामस्तरीय समितीने स्थळ पाहणी करावी. 08 जानेवारी ते 12 जानेवारी 2026 या कालावधीत स्थळपाहणी अहवाल उपविभागीय स्तरीय समितीकडे सादर करावा. 13 जानेवारी ते 15 जानेवारी 2026 या कालावधीत उपविभागीय स्तरीय समितीने सदर अहवाल जिल्हाधिकारी यांचेकडे सादर करावा.
खरीप हंगाम 2025 मध्ये विहीत मुदतीत ई-पीक पाहणीची नोंद न झालेल्या शेतक-यांच्या पिकांची ऑफलाइन पाहणी करणे बाबत शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कार्यवाहीबाबत जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांना कळविण्यात आलेले आहे असेही निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी कळविले आहे.




