महाराष्ट्रसोलापूर

सोलापूर जिल्ह्यात नवरात्र उत्सवात डॉल्बी, डीजे व लेझर लाईटवर बंदी

B1न्यूज मराठी नेटवर्क

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात यंदा २२ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत पारंपरिक पद्धतीने व मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा केला जाणार आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत डॉल्बी साऊंड सिस्टम, डीजे व लेझर लाईटच्या वापरामुळे नागरिकांच्या आरोग्यावर होणाऱ्या परिणामांची गंभीर नोंद घेत जिल्हाधिकारी कुमार अशिर्वाद यांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३(१) अन्वये आदेश निर्गमित करत, सोलापूर जिल्ह्यात नवरात्र उत्सवाच्या काळात सर्व सार्वजनिक शक्ती देवी उत्सव मंडळे, गरबा व दांडिया आयोजक मंडळे यांना डॉल्बी, डीजे व लेझर लाईटच्या वापरास कडक प्रतिबंध घातला आहे.

मागील वर्षी काही भाविकांना डॉल्बी व डीजेच्या प्रचंड आवाजामुळे कान, छातीवर परिणाम होऊन गंभीर त्रास झाले होते. काही घटनांमध्ये लेझर लाईट डोळ्यावर पडल्यामुळे वृद्ध व लहान मुलांच्या डोळ्यांना इजा झाली होती.

जेष्ठ नागरिक संघटनांनी याबाबत तक्रारी करीत शारीरिक व मानसिक त्रासाचा उल्लेख केला होता. सोलापूर उपविभागीय अधिकारी, सोलापूर क्र. १ यांनी दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी याबाबत अहवाल सादर केला होता. डॉल्बी, डीजे आणि लेझर लाईट यांचा वापर सणाच्या पारंपरिकतेस बाधा आणत असल्या बरोबरच आरोग्यासही धोकादायक ठरत असल्यामुळे हा निर्णय अत्यावश्यक असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी स्पष्ट केले.

या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यात नवरात्र उत्सव दरम्यान कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात डॉल्बी, डीजे किंवा लेझर लाईट वापरणे कायद्याने प्रतिबंधित आहे. सर्व मंडळांनी व आयोजकांनी या आदेशाचे पालन करावे, अन्यथा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button