सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी खुला

0

पुण्याच्या वाहतूक व्यवस्थेसाठी हा पुल महत्वाचा ; पुणेकरांना गणेशोत्सव काळातला हा उपहार

B1न्यूज मराठी नेटवर्क

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तीन टप्प्यात कोटी ११८.३७ रूपये निधीतून उभा राहिला उड्डाण पुल

तीस मिनिटाचा वाहतूक कालावधी आला केवळ सहा मिनिटावर

पुणे, दि. १ : पुणे शहराच्या वाढत्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापणासाठी सिंहगड रस्त्यावरचा तीन टप्यातला सुमारे अडीच किलोमीटरचा पुल हा अत्यंत महत्वाचा असून या पुलामुळे पुणेकरांची ट्रॅफिक मधून तर सुटका होणारच आहे, प्रदूषण कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी हा उपहार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पणानंतर दिली.

सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाईम थिएटरपर्यंतचा उड्डाणपूल आज नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसरा टप्पा आज वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलमताई गोरे,केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहळ, नगरविकास, परिवहन आणि सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री श्रीमती माधुरी मिसाळ, आ. भिमराव तापकीर, आ. बापूसाहेब पठारे, आ. सुनील कांबळे, विधान परिषदेचे आ. योगेश टिळेकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश गुप्ता,अतिरिक्त महापालिका आयुक्त पृथ्वीराज बी पी, शहर मुख्य अभियंता प्रशांत वाघमारे यावेळी उपस्थित होते.

सिंहगड रस्त्यावरून धायरी, नऱ्हे, खडकवासला, वडगाव बुद्रुक, नांदेड सिटी तसेच बेंगळुरू-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर दररोज सुमारे दीड लाखाहून अधिक वाहनांची वाहतूक होते. या मार्गाच्या एका बाजूला मुठा नदी व दुसऱ्या बाजूस डोंगर असल्याने पर्यायी रस्ता शक्य नसल्यामुळे उड्डाणपूल उभारणे आवश्यक होते. पुणे महानगरपालिकेमार्फत उड्डाणपुलाचे भूमिपूजन केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते २१ सप्टेंबर २०२१ रोजी करण्यात आले.

हा उड्डाणपूल तीन टप्प्यांत पूर्ण करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात सिंहगडकडून स्वारगेटकडे जाणारा ५२० मीटर लांबीचा राजाराम पूल चौकातील उड्डाणपूल (खर्च रु. १५ कोटी), दुसऱ्या टप्प्यात विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटरदरम्यानचा स्वारगेटकडून सिंहगडकडे जाणारा २.१ किमी लांबीचा उड्डाणपूल (खर्च रु. ६१ कोटी) आणि तिसऱ्या टप्प्यात वीर शिवाजी काशीद चौक ते कै. प्रकाश विठ्ठल इनामदार चौकदरम्यानचा सिंहगडकडून स्वारगेटला जाणारा १.५ किमी लांबीचा उड्डाणपूल (खर्च रु. ४२ कोटी) उभारण्यात आला. या तीनही टप्प्यांसाठी एकूण ११८.३७ कोटी रुपये खर्च आला आहे.

तीस मिनिटाचा कालावधी आता सहा मिनिटावर
पूर्वी राजाराम पूल ते फन टाईम थिएटर या २.६ किमी अंतरावरील सहा चौक पार करण्यासाठी सुमारे ३० मिनिटांचा कालावधी लागत होता. नव्या उड्डाणपुलामुळे हा वेळ आता केवळ ५ ते ६ मिनिटांवर आला आहे. पुलाखालील रस्त्याचे सुयोग्य विकसन करून दोन्ही बाजूस तीन लेनची वाहतूक क्षमता, प्रशस्त पदपथ आणि पार्किंगची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. तसेच दुभाजकाचे सुशोभीकरण सीएसआर अंतर्गत दोन एजन्सींमार्फत पूर्ण करण्यात आले असून, त्याची देखभाल पुढील पाच वर्षे त्यांच्याच माध्यमातून होणार आहे.
या उड्डाणपुलामुळे सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होऊन नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या