डॅशिंग PSI जरीना बागवान यांची API पदावर पदोन्नती – पांगरी गावच्या कन्येचा अभिमान

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील पांगरी गावची कन्या आणि पोलीस खात्यात आपल्या धडाडीने ओळख निर्माण करणाऱ्या जरीना नुरमहंमद बागवान यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) पदावर नुकतीच पदोन्नती झाली आहे. त्यांच्या या यशाबद्दल मनापासून हार्दिक शुभेच्छा देताना संपूर्ण गावकऱ्यांना आणि बार्शी तालुक्याला अभिमान वाटतो आहे. अत्यंत साध्या, ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या आणि जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर उंच भरारी घेणाऱ्या जरीना बागवान यांचा प्रवास खऱ्या अर्थाने प्रेरणादायी आहे. त्यांनी आपलं शालेय शिक्षण पांगरी येथील सर्वोदय विद्या मंदिर येथे पूर्ण केलं. त्यानंतर शिक्षणासाठी पुण्याकडे वाटचाल करत D.Ed पूर्ण केलं आणि पुढे बार्शीच्या झाडबुके कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. शिक्षण संपल्यानंतर MPSC परीक्षेची तयारी करत त्यांनी PSI पदाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि महाराष्ट्र पोलीस दलात यशस्वीरीत्या प्रवेश केला.
पोलीस सेवेत आल्यापासून त्यांनी आपली कर्तव्यनिष्ठा, शिस्त आणि सामाजिक भान यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यांची प्रथम नियुक्ती मुंबईत झाली. त्यानंतर अंधेरी पोलीस स्टेशन, मेघवाडी पोलीस स्टेशन, बांद्रा पश्चिम विभागीय कार्यालय अशा महत्त्वाच्या ठिकाणी त्यांनी जबाबदारी सांभाळली. पुढे लातूर येथे पोलिस प्रशिक्षण केंद्रात सेवा दिली, तसेच लातूर शहर विभागात SDPO म्हणून काम पाहिलं. सध्या त्या मीरा-भाईंदर, वसई-विरार विभागात कार्यरत असून, नुकत्याच मिळालेल्या पदोन्नतीनंतर आता त्या API पदावर विराजमान झाल्या आहेत.
त्यांची ही वाटचाल हे केवळ यशाचं प्रतीक नसून, ग्रामीण भागातील मुलींसाठी प्रेरणादायी असा प्रकाशवाटाही आहे. पांगरी गावाच्या मातीतून उगम पावलेली ही धडाडीची महिला अधिकारी आज आपल्या नावे अनेक यशाची शिखरं जिंकते आहे, आणि तिचा हा प्रवास अनेक नव्या स्वप्नांना दिशा दाखवतो आहे. जरीना बागवान यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्या कर्तृत्वाचा हा प्रवास असाच बहरत जावो, हीच प्रार्थना.



