बाल संरक्षण कक्षाच्या वतीने बार्शी तालुक्यात एकदिवसीय कार्यशाळा यशस्वीरीत्या पार

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : जिल्हा महिला व बालविकास विभाग सोलापूर, बाल संरक्षण कक्ष आणि महात्मा गांधी प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने बार्शी तालुक्यातील अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक आणि पोलीस पाटील यांच्यासाठी एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. ही कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सभागृह, बार्शी येथे संपन्न झाली.
कार्यशाळेचे उद्घाटन बार्शी ग्रामीण प्रकल्पाच्या बालविकास प्रकल्प अधिकारी प्रतिभा साखरे व भुजंग चिंताकोठे यांच्या हस्ते, तर पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बाल कल्याण समितीच्या सदस्य सुवर्णा कोकरे, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड, संरक्षण अधिकारी अमोल जमदाडे, ॲड. श्वेता भादुले, सुजाता अंधारे तसेच बार्शी तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे हे मान्यवर उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात प्रतिभा साखरे यांनी सांगितले की, “बालकांवर कोणताही अन्याय होणार नाही याची जबाबदारी अंगणवाडी सेविकांवर असून, एक सुदृढ समाज घडवण्यासाठी बालकांचे संरक्षण अत्यंत आवश्यक आहे.”
पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी बार्शी तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती दिली. त्यांनी असे विवाह होऊ नयेत यासाठी ग्रामसेवकांनी व बाल संरक्षण कक्षाने पोलिसांना पूर्ण सहकार्य द्यावे, असे आवाहन केले.
या कार्यशाळेमध्ये “बाल न्याय (काळजी व संरक्षण) अधिनियम 2015”, “बाल लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायदा 2012 (POCSO)”, आणि “बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006” याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. ॲड. श्वेता भादुले यांनी POCSO कायद्यावर मार्गदर्शन केले, तर ॲड. सुवर्णा कोकरे यांनी बालविवाह प्रतिबंध अधिनियम आणि ग्रामसेवकांची भूमिका स्पष्ट केली. कार्यशाळेचे यशस्वी आयोजन व नियोजन बाल संरक्षण कक्षातील पल्लवी वटाणे व प्रसाद बलकुरमठ जगन्नाथ जाधव यांनी केले.



