बार्शी शहर पोलीस ठाणेच्या वतीने महाराष्ट्रातील पहिली औषधी तसेच दुर्मिळ वृक्ष नर्सरीची उभारणी
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शहर, बार्शी तालुका, पांगरी तसेच वैराग पोलीस ठाणे यांच्या वतीने मिशन विकसीत गाव अभियाना अंतर्गत तालुक्यातील शेतकरी वर्ग यांना आधुनिक व सेंद्रीय शेती यावर मोफत मार्गदर्शन करण्याकरीता प्रशिक्षण कार्यशाळा यशवंतराव चव्हाण सभागृह येथे दि. २६/०७/२०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले.
कार्यशाळेस विज्ञान संत अंकुश पाटील सांगली, कृषीतज्ञ विद्यासागर कोळी मुरूड जि लातूर, कृषीतज्ञ प्रकाश पवार जळगाव, कृषीतज्ञ विनायक पाटील यांचे देखील मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मिशन विकसीत गाव अभियानांतर्गत बार्शी तालुक्यातील धस पिंपळगाव हे गाव दत्तक घेतले आहे. पिंपळगाव हे सुजलम सुफलम करण्याचा त्यांनी निश्चय केला आहे. तेथे त्यांनी प्राचीन महादेवाचे दर्शन घेवून ७०० वृक्षांची लागवड केली. त्यानंतर गाताची वाडी येथे १००० वृक्षांची लागवड केली.
पोलीस अधीक्षक यांनी कार्यक्रमात शेतकऱ्यांना संबोधित करताना पावसाचे पाणी आडविणे, ठिकठिकाणी शेततळे बांधणे, वृक्ष लागवड करणे, जमिनीखाली पाण्याची पातळी वाढविण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. प्रत्येकाने सेंद्रीय पध्दतीने शेती करून शेतमालाचे उत्पन्न वाढविण्याचे उपाय सांगितले. आपण बाजारात न जाता व्यापाऱ्याने शेतात आले पाहिजे असेही त्यांनी सांगितले.
बार्शी शहर पोलीस ठाणे हद्दीमध्ये सिध्देश्वर नगर, कासारवाडी रोड येथे बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या वतीने महाराष्ट्रातील पाहिली दुर्मिळ व औषधी वनस्पतीची नर्सरी उभारण्यात आली आहे. सदर नर्सरीचे उद्घाटन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते झाले आहे. या नर्सरीमध्ये ५००० रोपांच्या क्षमतेची एकुण ३० प्रकारच्या वृक्षांच्या रोपांची निर्मीती करण्यात आली आहे. या वृक्षांचा फायदा हरीत वारी या अभिनव उपक्रमासाठी होणार आहे.
बार्शी शहरातील वृक्ष संवर्धन समितीने ठिकठिकाणी वृक्ष लागवड करून पर्यावरण संतुलित राखण्याचे कार्य केले आहे. त्यांचे कार्य देखील कौतुकास्पद असल्याने वृक्ष संवर्धन समितीचा पोलीस अधीक्षक सो यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये मोफत रूद्राक्ष थेरपीचे आयोजन देखील करण्यात आले होते. श्री गुरु भांगे यांनी तालुक्यातील १५० शेतकऱ्यांना मोफत रूद्राक्ष थेरपी दिली.
दुर्मिळ व औषधी वनस्पतीची नर्सरी उभारण्यासाठी पोलीस अधीक्षक . अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांनी वेळोवेळी मार्गदर्शन केले. नर्सरी उभारण्यासाठी बांर्शी शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे, पोसई महेश गळगटे व बार्शी शहर पोलीस ठाणे येथील पोलीस बांधवानी प्रयत्न केले.




