वैरागला महावितरणचा स्वतंत्र उपविभाग आणि बार्शी शहरात ‘सी’ विभाग सुरू करा – आमदार दिलीप सोपल यांची विधानसभेत मागणी

पावसाळी अधिवेशनात वाढत्या औद्योगिक व प्रशासकीय गरजांचा केला उल्लेख
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील सर्वात मोठे गाव व नगरपंचायत असलेल्या वैराग येथे महावितरणचा स्वतंत्र उपविभाग सुरू करण्यात यावा, तसेच बार्शी शहरात वाढता औद्योगिक विस्तार लक्षात घेता बार्शी शहरासाठी महावितरणचा स्वतंत्र ‘सी’ विभाग सुरू करण्यात यावा, अशी मागणी आमदार दिलीप सोपल यांनी राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात केली.
बुधवारी दि. ८ जुलै सभागृहात बोलताना आमदार सोपल यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांचे या विषयाकडे लक्ष वेधत वरील विषयांच्या मंजुरीची मागणी करत विनंती केली.
यावेळी बोलताना आमदार सोपल म्हणाले की, भौगोलिक दृष्ट्या विस्तीर्ण व मोठा असलेल्या बार्शी तालुक्यातील सर्वात मोठे गाव आणि नगरपंचायत असलेल्या वैराग येथे महावितरणचा स्वतंत्र उपविभाग सुरू झाल्यास या माध्यमातून शासनाला दरवर्षी अंदाजे ४६ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
बार्शी शहराचा मुद्दा उपस्थित करताना त्यांनी सांगितले की, शहरात औद्योगिक विकास झपाट्याने होत असल्यामुळे बार्शी शहराचे विभाजन करून महावितरणचा स्वतंत्र ‘सी’ विभाग निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
यावेळी अध्यक्षांना उद्देशून बोलताना आमदार सोपल म्हणाले की, १९८५ पासून आमदार म्हणून सभागृहाच्या कामकाजाचा मला अनुभव आहे. विधानसभेचे माजी अध्यक्ष मधुकरराव चौधरी यांनी अध्यक्षपदावर असताना सभागृहातून शासनाला दिलेल्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी झाली होती. त्याचप्रमाणे आपणही बार्शी मतदारसंघाच्या विकासाशी संबंधित या महत्त्वाच्या मागण्यांबाबत शासनाला आवश्यक निर्देश द्यावेत. शासन त्या निर्देशांची सकारात्मक अंमलबजावणी करेल, असा विश्वास आणि अपेक्षा असल्याचेही त्यांनी सभागृहात व्यक्त केले.




