बार्शी नगरपालिकेच्या शाळा क्र. २१ ला ‘CBSE’ मान्यता मिळवण्यासाठी मा. आ. राजाभाऊ राऊत सरसावले!

शिक्षणमंत्री दादा भुसे यांची मंत्रालयात घेतली भेट; शिक्षण सचिवांना तातडीने कार्यवाहीचे आदेश
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी शहर आणि तालुक्यातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आजच्या स्पर्धेच्या युगात दर्जेदार आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण मिळावे, यासाठी आमदार राजाभाऊ राऊत यांनी मोठे पाऊल उचलले आहे. बार्शी शहरातील ढगे मळा, सिद्धेश्वर नगर येथे नगरपालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या ‘नगरपालिका शाळा क्रमांक २१’ या अत्याधुनिक शाळेला इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत (१ ली ते १२ वी) CBSE अभ्यासक्रमाची (इंग्रजी माध्यम) स्वयंअर्थसहाय्य तत्त्वावर मान्यता मिळावी, अशी आग्रही मागणी आमदार राजाभाऊ राऊत यांनी राज्याचे शिक्षणमंत्री मा.ना. दादा भुसे यांच्याकडे केली आहे.
मुंबई येथील मंत्रालयात आमदार राजाभाऊ राऊत यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेऊन यासंदर्भातील सविस्तर मागणीचे पत्र दिले. यावर शिक्षणमंत्र्यांनी अत्यंत सकारात्मकता दर्शवत, शिक्षण खात्याच्या सचिवांना या प्रस्तावावर तातडीने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आदेश पारित केले आहेत.
गरीब विद्यार्थ्यांना मिळणार ‘CBSE’ पॅटर्नचे दर्जेदार शिक्षण आजच्या डिजिटल आणि आधुनिक युगात सर्वसामान्य व गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांना आर्थिक अडचणींमुळे महागड्या खाजगी शाळांमध्ये CBSE पॅटर्नचे शिक्षण घेणे परवडत नाही. हीच बाब लक्षात घेऊन आमदार राजाभाऊ राऊत यांच्या संकल्पनेतून बार्शी नगरपरिषदेच्या माध्यमातून तब्बल एक एकर जागेमध्ये सर्व सोयीसुविधांनी युक्त अशी अत्याधुनिक ‘शाळा क्रमांक २१’ उभारण्यात आली आहे.
अतिशय माफक फीमध्ये प्रवेश! या शाळेला CBSE बोर्डाची अधिकृत मान्यता मिळाल्यानंतर, बार्शी शहर व तालुक्यातील पालकांना आपल्या पाल्यांना अतिशय माफक आणि नाममात्र फीमध्ये उच्च दर्जाचे इंग्रजी माध्यमाचे शिक्षण देता येणार आहे. आमदार राऊत यांच्या या दूरगामी आणि शिक्षणस्नेही निर्णयामुळे बार्शीच्या शैक्षणिक क्षेत्रात एक क्रांती घडणार असून, सर्वसामान्य पालकांमधून या निर्णयाचे अत्यंत उत्स्फूर्त स्वागत होत आहे.




