बार्शीमहाराष्ट्र

अज्ञान दूर केले की ज्ञानच उरते; अवगुण घालविण्यासाठी विचारांची गरज : हभप जयवंत बोधले महाराज

B1न्यूज मराठी नेटवर्क

बार्शी : चांगले आणि वाईट याचा विचार करण्याची क्षमता प्रत्येकामध्ये असते; मात्र त्याचा वापर कधी, कोठे आणि कशाप्रकारे करायचा याचे तारतम्य असणे आवश्यक आहे. ज्ञान मुळातच व्यापक असून विचारांच्या माध्यमातून अज्ञान व असार बाजूला सारले की सार उरते. त्यामुळे गुण मिळविण्यापेक्षा अवगुण दूर करण्यासाठी विचार करणे अधिक महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हभप जयवंत बोधले महाराज यांनी केले.

श्रीमद् भागवत कथामृताच्या आठव्या पुष्पात ते निरूपण करीत होते. आपण नेमके कोण आहोत, याची जाणीव होईपर्यंत ‘मीपणा’ आणि अहंकाराची भावना संपत नाही. आत्मज्योतीच्या प्रकाशाने मनावरील अज्ञानाचे आवरण आणि अहंकार दूर करण्यासाठी विचारांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. श्रीमद् भागवत हा केवळ धार्मिक ग्रंथ नसून आपल्या दैनंदिन जीवनातील घटना आणि घडामोडींशी निगडित असलेला ग्रंथ आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.500

कर्दम ऋषी आणि देवभूती यांच्या संसाराचा संदर्भ देताना सुखी संसारासाठी परस्परांवरील विश्वास, मनाची पवित्रता, संयम, सेवा, सद्भावना आणि गोड वाणी आवश्यक असल्याचे बोधले महाराजांनी सांगितले. त्यांच्या पोटी जगाला ब्रह्मज्ञान देण्यासाठी ब्रह्मज्ञानी कपिल मुनींचा अवतार झाला. कर्दम ऋषी निघून गेल्यानंतर देवभूतीने कपिल मुनींकडे ब्रह्मतत्त्व व ब्रह्मज्ञान सांगण्याची अपेक्षा व्यक्त केली. आई श्रोता आणि पुत्र तत्त्ववेत्ता हे गुरु-शिष्य परंपरेतील अद्वितीय उदाहरण असल्याचे त्यांनी नमूद केले.

आनंद हा केवळ चर्चेचा विषय नसून अनुभूतीचा विषय आहे. विजयानंद क्षणिक असतो, तर ब्रह्मानंद कायमस्वरूपी आणि सतत वाढत जाणारा असतो. आपल्याकडे असलेले ज्ञान इतरांना देण्यातही आनंदाची अनुभूती मिळते, असे त्यांनी सांगितले.

मनाला आकार, वजन, उंची किंवा सीमा नसते. ते चंचल, चपळ आणि सतत भरकटणारे आहे. मनावर नियंत्रण मिळवून शरणागतीची भूमिका स्वीकारल्यास बंधनातून मुक्तीचा मार्ग सापडतो. आत्मस्वरूपाचे अज्ञान दूर झाल्यानंतरच ब्रह्मज्ञानाची अनुभूती होते, असे निरूपणाच्या शेवटी हभप जयवंत बोधले महाराज यांनी स्पष्ट केले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button