बार्शी तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई! अवघ्या ५ तासांत ९० किलोमीटर पाठलाग करून ट्रॅक्टर चोरीचा गुन्हा उघडकीस

तीन आरोपी जेरबंद; ६ लाख ५० हजारांचा ट्रॅक्टर, मोटारसायकलसह शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत
B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि त्यांच्या पथकाने चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याची सातत्यपूर्ण कामगिरी सुरू ठेवली आहे. याचाच प्रत्यय पुन्हा एकदा आला असून, भोईंजे येथून चोरीला गेलेला जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर अवघ्या पाच तासांत शोधून काढत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे, सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तब्बल ९० किलोमीटरपर्यंत पाठपुरावा करून पोलिसांनी चोरीचा ट्रॅक्टर आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही हस्तगत केली आहे.
अशी उघडकीस आली चोरी याबाबत अधिक माहिती अशी की, भोईंजे येथील सोज्वल बबन चव्हाण यांचा जॉन डिअर कंपनीचा ट्रॅक्टर त्यांच्या शेतातून रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला होता. याप्रकरणी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३८२/२०२६ अन्वये चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले तसेच तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून तपासाला गती दिली. या तपासात भोईंजे गावातीलच तीन युवकांनी ट्रॅक्टर चोरी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी तातडीने तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
तुळशी गावातील जंगलात लपविला होता ट्रॅक्टर आरोपींनी चोरी केलेला ट्रॅक्टर माढा-पंढरपूर मार्गावरील तुळशी गावाजवळील जंगलात लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत चोरीस गेलेला सुमारे ६ लाख ५० हजार रुपये किमतीचा ट्रॅक्टर हस्तगत केला. तसेच चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकलही जप्त करण्यात आली. अशा प्रकारे अवघ्या पाच तासांत आणि तब्बल ९० किलोमीटरचा पाठपुरावा करून बार्शी तालुका पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेत चोरीचा शंभर टक्के मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळविले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे १) संकेत सर्जेराव करळे
२) प्रेम धर्मराज नवले ३) प्रथमेश संजय सुरवसे , वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक सदाशिव गवळी, संदीप निचळ, गणेश दळवी, बाबासाहेब हांडे, आकाश कांबळे आणि होमगार्ड जाधव यांनी सहभाग घेतला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि जलद तपासाच्या माध्यमातून बार्शी तालुका पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे परिसरात पोलिसांच्या कामगिरीची चर्चा होत आहे.




