जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण मोहीमेत सहभागी होण्याचे नवी मुंबईकर नागरिकांना आवाहन

0

B1न्यूज मराठी नेटवर्क

नवी मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मोठया प्रमाणात वृक्षारोपण मोहीम राबविण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. 5 जून 2025 रोजी ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचे निर्मूलन (Ending Plastic Pollution Globally)’ या संकल्पनेंतर्गत पर्यावरण दिन साजरा होत असताना, महानगरपालिकेने पर्यावरणाची काळजी घेण्यासाठी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या निर्देशानुसार, आगामी पावसाळ्यात उद्यान विभागाच्या माध्यमातून व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेअंतर्गत सुरंगी, मलबेरी, जाम, कदंब, काजू, बांबू, करंज, आवळा, तुती, शिरीष, सुपारी, अशोक, कडूनिंब, चिकू, पेरू, सीताफळ आणि बदाम यासारख्या विविध देशी वृक्षांची आणि फळझाडांची लागवड जैवविविधता वाढीच्या दृष्टीने करण्याचे नियोजन आहे.

या अंतर्गत संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रात ६० हजारांपेक्षा अधिक वृक्षांची लागवड केली जाणार आहे. या उपक्रमामुळे शहराच्या हिरवाईत वाढ होणार असून पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होईल. तसेच प्लास्टिक प्रदूषण कमी करण्याच्या जागतिक प्रयत्नांकरिता नवी मुंबई महानगरपालिकेचे हे योगदान निश्चितच प्रेरणादायी ठरेल.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत शहरातील नागरिकांनाही या वृक्षारोपण मोहीमेत सक्रिय सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जेणेकरून या महत्त्वपूर्ण उपक्रमाला लोकसहभागातून अधिक बळ मिळेल.

आज प्लास्टिक प्रदूषण हे जगासमोर एक मोठे आव्हान आहे आणि यावर मात करण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे आहे. वृक्षारोपण ही केवळ पर्यावरणाची काळजी घेण्याची बाब नाही, तर आपल्या भावी पिढ्यांसाठी एक सुरक्षित आणि सुंदर भविष्य निर्माण करण्याची जबाबदारी आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या या वृक्षारोपण मोहीमेमुळे शहराच्या पर्यावरणात सकारात्मक बदल घडून येईल आणि प्लास्टिक प्रदूषणाच्या विरोधात एक व्यापक संदेश प्रसारित होईल. त्यामुळे उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या