बँकेत पिस्टलने फायरींग करून, कोयत्याने मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी पिस्टलसह गजाआड!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सुर्डी येथे दि. 07 मार्च 2025 रोजी दुपारी 4:15 वाजता तीन अनोळखी इसमांनी सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत धाडसी दरोडा टाकला. आरोपींनी पिस्टलने फायरींग करून दहशत माजवली आणि बँक मॅनेजर यांना कोयत्याने मारहाण करून जखमी केले. त्यानंतर ₹1,54,300/- रोख रक्कम जबरदस्तीने लुटून आरोपी मोटरसायकलवरून पसार झाले.
या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जालिंदर नालकूल यांनी बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. दिलीप ढेरे यांना तातडीने कारवाईचे आदेश दिले. पोलीस पथकाने लगेच सुडी परिसरात आरोपींचा शोध सुरू केला. कासारवाडी ते रेल्वे फाटक, बार्शी या दरम्यान तीन इसम संशयास्पद हालचाल करत असल्याचे दिसले. पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले.
चौकशीत आरोपींनी बँकेत जबरी चोरी केल्याची कबुली दिली. त्यांच्याकडून MADE IN USA चे एक पिस्टल, कोयता आणि लुटीतील ₹99,543/- रोख रक्कम जप्त करण्यात आली. बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. 75/25 भारतीय दंड संहिता कलम 311, 112, 3(5) व शस्त्र अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायालय, बार्शी येथे हजर करण्यात आले असता 5 दिवसांची पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली.
सदर आरोपींपैकी एकावर यापूर्वी दंगलीचा गुन्हा दाखल असल्याची माहिती असून, ही टोळी अतिशय धोकादायक असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
शौर्यपूर्ण कामगिरी करणारे पोलीस अधिकारी व कर्मचारी : ही कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक प्रितम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या कार्यवाहीत प्रभारी अधिकारी सहा. पो.नि. दिलीप ढेरे, पो. उपनिरीक्षक बालाजी वळसने, पोलीस हवालदार अभय उंदरे, धनराज केकाण, पोलीस नाईक सागर शेंडगे, उत्तरेश्वर जाधव, सिध्देश्वर लोंढे, हनुमंत गवळी, युवराज गायकवाड यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या यशस्वी ऑपरेशनबद्दल स्थानिक नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.