बार्शी तालुका पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: कायदेभंग करणाऱ्या कला केंद्रावर छापा, 50 लाखांचा मुद्देमाल जप्त

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : शासनाने घालून दिलेल्या वेळेनंतरही सुरू असलेल्या कला केंद्रावर बार्शी तालुका पोलिसांनी मध्यरात्री धडक कारवाई केली. या कारवाईत 50 लाख 13 हजार 460 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 72 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार हद्दीतील अवैध व्यवसायांवर कारवाईची मोहीम सुरू आहे. त्याच भाग म्हणून दि. 24 मे 2026 रोजी रात्री 1:30 वाजण्याच्या सुमारास बार्शी ते लातूर रोडवरील ‘लवंगी मिरची’ या कला केंद्रात नियमबाह्य पद्धतीने कार्यक्रम सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाड टाकली. त्यावेळी कला केंद्र सुरू असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून नृत्य करणाऱ्या नृत्यांगना, ग्राहक, आदी एकूण 72 जणांना ताब्यात घेतले. या सर्वांवर भारतीय न्याय संहिता, महाराष्ट्र पोलीस अधिनियम व महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
छाप्यात पोलिसांनी 50,13,460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये मोठी रोख रक्कम, मोबाईल फोन, साउंड सिस्टीम व इतर साहित्य, चारचाकी व दुचाकी वाहने तसेच देशी दारूच्या बाटल्यांचा समावेश आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सहायक पोलीस अधीक्षक अंजना कृष्णा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. नि. महेश माने यांच्या नेतृत्वाखाली पो. उपनिरीक्षक बालाजी वळसने, दत्तात्रय भालेराव, चंद्रकांत घोळवे, पोहेकॉ धनराज केकाण, स्वाती काटे, पो. कॉ. राहुल बोंदर, सुरेश बिरकले, व महिला पथकाने ही यशस्वी कामगिरी बजावली.




