क्राईमबार्शीमहाराष्ट्र

बार्शीत गुटखा रॅकेटवर पोलिसांचा मोठा प्रहार; आयपीएस अंजना कृष्णा यांच्या कारवाईने खळबळ

B1न्यूज मराठी नेटवर्क5000

बार्शी : शहरात अनेक वर्षांपासून बिनधास्तपणे सुरू असलेल्या अवैध गुटखा व्यवसायाला अखेर मोठा हादरा बसला असून, आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या धडक कारवाईत लाखो रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. बालाजी कॉलनी परिसरातील एका संशयित गोडाऊनवर टाकलेल्या छाप्यात तीन पिकअप वाहनांमध्ये भरून गुटखा आणि तंबाखूजन्य साहित्य जप्त करण्यात आल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील काही व्यावसायिकांकडून ड्रायफ्रूट आणि किरकोळ व्यापाराच्या आडून गुटख्याचा मोठा साठा केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीची गुप्त पडताळणी केल्यानंतर पोलिसांनी नियोजनबद्ध कारवाई करत संबंधित गोडाऊनवर छापा टाकला. कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणावर प्रतिबंधित गुटखा, सुगंधी तंबाखू आणि विक्रीसाठी तयार ठेवलेला माल आढळून आला.5000विशेष म्हणजे, बार्शी उपविभागीय पोलीस अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार स्वीकारल्यानंतर अंजना कृष्णा यांनी शहरातील अवैध धंद्यांविरोधात मोहीम सुरू केली आहे. त्यांच्या नियुक्तीनंतर अवैध वाळू वाहतूक, जुगार, मटका आणि गुटखा व्यवसायावर लक्ष ठेवण्यात येत असल्याची चर्चा होती. मात्र, या कारवाईने गुटखा रॅकेटवर थेट आघात झाल्याचे मानले जात आहे.

कारवाईनंतर जप्त माल बार्शी शहर पोलीस ठाण्यात आणण्यात आला असून, संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके कायदा तसेच इतर लागू कायद्यांनुसार गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. सोलापूर येथील अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी जप्त मालाची तपासणी सुरू केली आहे.

दरम्यान, या कारवाईमुळे शहरातील गुटखा पुरवठा साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक वर्षांपासून बार्शीत गुटख्याचा मोठा काळाबाजार सुरू असल्याच्या तक्रारी होत्या. काही ठिकाणी रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर मालाची वाहतूक होत असल्याचेही बोलले जात होते. मात्र, यापूर्वी किरकोळ विक्रेत्यांपुरत्याच कारवाया मर्यादित राहत असल्याने मुख्य सूत्रधारांवर कारवाई होत नसल्याची टीका होत होती.5000आता मात्र पोलिसांनी थेट साठवणूक केंद्रावर धाड टाकल्याने गुटखा माफियामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील अनेक अवैध व्यावसायिकांनी हालचाली कमी केल्याची चर्चा सुरू आहे.

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

या कारवाईनंतर सोशल मीडियावर आयपीएस अंजना कृष्णा यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. “बार्शीला कडक अधिकारी मिळाली”, “गुटखा माफियांना पहिला मोठा धक्का”, “लेडी सिंघम इन अॅक्शन” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत. अनेकांनी शहरातील इतर अवैध धंद्यांवरही अशाच प्रकारे कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांनी या कारवाईचे स्वागत करत, तरुण पिढीला व्यसनाच्या विळख्यात अडकवणाऱ्या रॅकेटविरोधात सातत्याने मोहीम राबविण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू असून, गुटखा पुरवठ्याच्या संपूर्ण नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.5000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button