मानवतावादी कार्यात समर्पित सेवेबद्दल रेडक्रॉसने केला बार्शीच्या डॉ. दिलीप कराड यांना राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : डॉ. दिलीप कराड यांना मानवतावादी कार्यासाठी समर्पित सेवेबद्दल रेडक्रॉसने प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे. १७ जुलै रोजी राष्ट्रपती भवनात पार पाडलेल्या रेडक्रॉसच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. मनसुख मांडवीय व आसाम राज्याचे राज्यपाल गुलाब चंद कटारीया यांच्या हस्ते हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.यावेळी राष्ट्रीय रेडक्रॉसचे उपाध्यक्ष अनंत पांढरे आदी उपस्थीत होते.
डॉ. दिलीप कराड यांनी बार्शी रेडक्रॉसच्या बधिर मुक विद्यालयासाठी, लायन्स क्लब ऑफ मॉन्स्चौ, जर्मनी, कडून देणगी संकलन, रेडक्रॉसच्या राज्यस्तरीय व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामध्ये महाराष्ट्र व कर्नाटकात पूरग्रस्त मदतीत सहभाग , हाँगकाँग रेडक्रॉसच्या डिसॅस्टर रिस्क रिडक्शन प्रकल्पामध्ये सहभाग, यूएस-एड्सच्या पॅन्डेमिक प्रीपेर्डनेस प्रकल्पामध्ये सहभाग , ऐच्छिक रक्तदान शिबिरांचे आयोजन, स्वतः १०२ वेळा रक्तदान, रेडक्रॉसच्या श्रीमान रामभाई शाह रक्तपेढीचे मानद सचिव पदाच्या माध्यमातून रकतपेढीचे व्यवस्थापन, जूनियर व यूथ रेडक्रॉसमध्ये सहभाग, दरवर्षी पंढरपूर येथे आषाढी एकादशीला प्रथमोपचार व औषधे वाटप , प्रथमोपचार प्रशिक्षक व अनेक शिबिरांचे आयोजन, शोध आणि बचाव शिबिरांचे आयोजन, एचआयव्ही/एड्स रुग्णांचे वैद्यकीय आणि सामाजिक समुपदेशन व संशोधन ब्रिटिश रेडक्रॉसच्या बार्शी दुष्काळ-मुक्ति प्रकल्पामध्ये सहभाग तसेच मानवता, निष्पक्षता, तटस्थता, स्वातंत्र्य, स्वैच्छिक सेवा, एकता आणि वैश्विकता ह्या रेडक्रॉस चळवळीच्या सात मूलभूत तत्वांना अनुसरून रेडक्रॉस स्वयंसेवकाचे कार्य केले आहे.
बार्शी रेडक्रॉसचे मानद सचिव अजित कुंकूलोळ तसेच उपाध्यक्ष अशोक डहाळे, संचालक सुभाष जवळेकर, प्रताप जगदाळे, डॉ. बाळासाहेब देशपांडे, बधिर मुक विद्यालयाचे सचिव संतोष सुर्यवंशी व रक्तपेढीचे चेअरमन डॉ. विक्रम निमकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. रामचंद्र जगताप यांनी अभिनंदन केले. शिवाजी महाविद्यालय बार्शीचे प्राचार्य डॉ. अब्दुल शेख व इतर प्राध्यापकांनी शुभेच्छा दिल्या.