मालवंडी शाळेतील २०८ विद्यार्थ्यांना शुद्ध पाण्याची प्रतीक्षा जिल्हा परिषद प्रशासनाकडे कायमस्वरूपी पाणी सुविधेची मागणी

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : तालुक्यातील मालवंडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होत नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. शाळेत पहिली ते चौथीपर्यंत एकूण २०८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र, विद्यार्थ्यांसाठी स्वच्छ व शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने शाळेत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष समाधान भागवत काटे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
या निवेदनाद्वारे संबंधित अधिकाऱ्यांनी या समस्येची गांभीर्याने दखल घेऊन मालवंडी जिल्हा परिषद शाळेत तातडीने शुद्ध पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा प्रश्न प्राधान्याने सोडविण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.




