छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र

दुष्काळावर मात करण्यासाठी जलसंधारणाची लोकचळवळ उभारा – ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा गौरव

B1न्यूज मराठी नेटवर्क350

हिंगोलीच्या दाटेगाव ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयांचा विभागस्तरीय प्रथम पुरस्कार

छत्रपती संभाजीनगर : विकसित महाराष्ट्राचे स्वप्न ग्रामीण भागातील गावे समृद्ध झाल्याशिवाय पूर्ण होणार नाही. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान गावांचा सर्वांगीण विकास करण्याची लोकचळवळ आहे. त्यामुळे सध्याच्या दुष्काळी परिस्थितीकडे जलसंधारणाची व्यापक कामे करण्याची संधी म्हणून पाहावे. प्रत्येक गावाने लोकसहभागातून जलसंधारणाची कामे हाती घेऊन दुष्काळावर मात करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी आज येथे केले.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत छत्रपती संभाजीनगर विभागातील उत्कृष्ट ग्रामपंचायतींचा विभागस्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण सोहळा, अभियान सन २०२६-२७ संदर्भातील विभागीय कार्यशाळा आणि ‘दुष्काळावर मात व समृद्ध गावाचा संकल्प’ या विषयावरील परिसंवाद केंब्रिज स्कूल चौक मैदान येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री.गोरे बोलत होते. या सोहळ्यात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या ग्रामपंचायतींचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश कदम, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांची प्रमुख उपस्थिती होती.350यावेळी आमदार प्रशांत बंब, अनुराधा चव्हाण, रमेश बोरणारे, संजना जाधव, विलास भुमरे, नारायण कुचे, सुहास शिरसाट, राज्यस्तरीय अभ्यास समितीचे अध्यक्ष रितेश वानखडे (राज्यमंत्री दर्जा), इंद्रीस मुलतानी (राज्यमंत्री दर्जा), जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश गलांडे, उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, सभापती संजय गराड, कल्याण गायकवाड, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिन्नू पी. एम. यांच्यासह विभागातील विविध जिल्हा परिषदांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती, पंचायत समिती पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मंत्री जयकुमार गोरे म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेवटच्या नागरिकापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. ग्रामपंचायतींना सक्षम करून गावातील पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण, स्वच्छता, जलसंधारण आणि नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणणे हा अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेणे आवश्यक आहे. यापूर्वी जलयुक्त शिवार अभियान आणि पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागाची चळवळ उभी राहिली होती. त्याच धर्तीवर गावागावांत जलसंधारणाची कामे व्हावीत, यासाठी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात जलसंधारणाच्या कामांना सर्वाधिक गुण देण्यात आले आहेत. लोकप्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामस्थांनी या कामांसाठी एकत्र यावे, असे त्यांनी सांगितले.

अभियानातील पुरस्कारांसाठी ग्रामपंचायतींच्या कामांचे निष्पक्ष आणि पारदर्शक मूल्यमापन करण्यात आले. प्रत्येक गावातील कामांची तीन वेळा तपासणी करण्यात आल्याचे सांगून मंत्री गोरे म्हणाले की, पुरस्कार मिळविण्यापेक्षा गाव समृद्ध करणे महत्त्वाचे आहे. पुरस्कार न मिळालेल्या ग्रामपंचायतींनी निराश न होता अधिक जोमाने काम करावे. प्रशासक नियुक्त असलेल्या ग्रामपंचायतींनीही या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.350अभियानाच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या विकासकामांची आकडेवारी सादर करताना मंत्री गोरे यांनी सांगितले की, राज्यातील ५ हजार ७४६ ग्रामपंचायती अभियानात सहभागी झाल्या. अभियानाच्या माध्यमातून सुमारे ६९ लाख आयुष्मान भारत कार्डे, १ लाख १० हजार दिव्यांगांना ओळखपत्रे उपलब्ध करून देण्यात आली. तसेच ४ हजार १८ ग्रामपंचायतींच्या वेबसाइट तयार करण्यात आल्या आणि ४ हजार ४७ ग्रामपंचायतींमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.

अभियान कालावधीत ३ लाख ५९ हजार घरे पूर्ण झाली, तर घरकुलासाठी जागा नसलेल्या ५४ हजार ४७७ भूमिहीन लाभार्थ्यांना जमीन उपलब्ध करून देण्यात आली. विविध योजनांच्या समन्वयातून २ हजार ७०६ किलोमीटर गावांतर्गत रस्ते आणि २ हजार ७३० किलोमीटर पाणंद रस्त्यांची कामे करण्यात आली.

याशिवाय ५ हजार ११८ स्मशानभूमींमध्ये सुविधा उपलब्ध करून देणे, २ हजार ३७८ गावांमध्ये व्यायामशाळा, ४ हजार २८२ गावांमध्ये वाचनालये, १३ हजार २३९ शाळांमध्ये मुलांसाठी आणि १२ हजार ४८७ शाळांमध्ये मुलींसाठी शौचालयांची सुविधा निर्माण करण्यात आली. अभियान कालावधीत ८१५ कोटी रुपयांची घरपट्टी आणि २४१ कोटी रुपयांची पाणीपट्टी वसुली झाली. तसेच ग्रामपंचायतींच्या माध्यमातून सुमारे ६७ लाख वृक्षांची लागवड करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणाऱ्या जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कामगिरीचे रिपोर्ट कार्ड तयार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अभियान यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सरपंच, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी व कर्मचाऱ्यांचे त्यांनी विशेष कौतुक केले. उपस्थितांना अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले गाव समृद्ध करण्याचा सामूहिक संकल्प करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

दुष्काळमुक्तीसाठी प्रत्येक गावाने पुढाकार घ्यावा – अतुल सावे

इतर मागासवर्ग बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे म्हणाले की, मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रत्येक गावाने पाण्याचा प्रत्येक थेंब साठविण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे. ‘जलतारा’ शोषखड्डे, तलाव व विहिरींमधील गाळ काढणे, बोअरवेल पुनर्भरण, जलसंधारण आणि पाणीपुरवठ्याच्या कामांना प्राधान्य द्यावे. नदीजोड आणि वॉटर ग्रीड यांसारखे प्रकल्प भविष्यातील जलसुरक्षेसाठी महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.350ग्रामपंचायतींनी सौरऊर्जेचा वापर वाढवावा. शेतीसाठी सौरपंप तसेच घरांवर सौरऊर्जा प्रकल्प उभारून विजेच्या खर्चात बचत करावी. उत्कृष्ट ग्रामपंचायतींना मिळालेले पुरस्कार हे गावातील एकजूट, लोकसहभाग आणि पारदर्शक कारभाराची पोचपावती आहेत. दुष्काळ निवारणासाठी राज्य शासन ग्रामपंचायती आणि नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

लोकसहभाग हाच अभियानाचा गाभा – योगेश कदम

ग्रामविकास व पंचायत राज राज्यमंत्री योगेश रामदास कदम म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या माध्यमातून केंद्र, राज्य व जिल्हास्तरावरील विविध योजनांचा समन्वय साधण्यात येत आहे. त्यामुळे गावातील विकासकामांना गती मिळत असून नागरिकांमध्ये योजनांविषयी जागरूकता वाढली आहे.

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जलसंधारण आणि पाणीसाठवणुकीची कामे लोकसहभागातून करणे आवश्यक आहे. दापोली तालुक्यात लोकसहभागातून शासनाच्या निधीचा वापर न करता सुमारे १ हजार १०० वनराई बंधारे उभारल्याचे उदाहरण त्यांनी दिले. कोणतेही अभियान नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतींनी लोकसहभाग वाढवून अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक प्रभावी कामगिरी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

दुष्काळावर मात करण्यासाठी लोकचळवळ आवश्यक – मेघना साकोरे-बोर्डीकर

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या की, विकसित भारत २०४७ चे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ग्रामीण भागातील प्रत्येक गाव समृद्ध झाले पाहिजे. मराठवाड्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी महिला बचत गट, लखपती दीदी, तरुण पिढी, सरपंच, ग्रामसेवक आणि प्रशासनाच्या सहभागातून लोकचळवळ उभी करावी.

पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हिवरे बाजारच्या ग्रामविकासाचा आदर्श तसेच ‘जलतारा’ जलसंधारण उपक्रमाची संकल्पना गावागावांत पोहोचवावी. मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी होऊन जलसमृद्ध गावांचा संकल्प प्रत्यक्षात आणावा, असे त्यांनी सांगितले.

ग्रामविकास व पंचायत राज विभागाचे सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार म्हणाले की, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात राज्यातील १०० टक्के ग्रामपंचायतींचा सहभाग बंधनकारक करण्यात आला आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीने १०० पैकी किमान ७० गुण मिळविणे आवश्यक आहे. अभियानातील आठ प्रमुख घटकांची ग्रामसभांच्या माध्यमातून माहिती देऊन नागरिकांचा सहभाग वाढवावा.350विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्रास्ताविकात सांगितले की, हा कार्यक्रम केवळ पुरस्कार वितरणाचा नसून दुष्काळावर मात करून प्रत्येक गाव समृद्ध करण्याची संकल्पसभा आहे. कार्यक्रमस्थळी सुमारे २ हजार ६०० ग्रामपंचायतींचे सरपंच व उपसरपंच उपस्थित असून, मराठवाड्यातील ७ हजार ६८९ ग्रामपंचायतींमध्ये कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

दाटेगावला विभागस्तरीय प्रथम पुरस्कार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान सन २०२५-२६ अंतर्गत विभागस्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये हिंगोली जिल्ह्यातील दाटेगाव (ता. जि. हिंगोली) ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळविला. या ग्रामपंचायतीला एक कोटी रुपयांचे पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

लातूर जिल्ह्यातील आनंदवाडी (गौर), ता. निलंगा ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवून ८० लाख रुपयांचे, तर वंजरवाडी, ता. जि. बीड ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवून ६० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले.

छत्रपती संभाजीनगर जिल्हास्तरीय अत्युत्कृष्ट ग्रामपंचायत पुरस्कारांमध्ये लाडगाव/हिवरा, ता. छत्रपती संभाजीनगर ग्रामपंचायतीने प्रथम क्रमांक मिळवून ५० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले. जरंडी, ता. सोयगाव ग्रामपंचायतीने द्वितीय क्रमांक मिळवून ३० लाख रुपये, तर पाटोदा, ता. छत्रपती संभाजीनगर ग्रामपंचायतीने तृतीय क्रमांक मिळवून २० लाख रुपयांचे पारितोषिक पटकाविले.

जलतारा शोषखड्डे व गुणांकनाबाबत तज्ज्ञांचे मार्गदर्शन

यावेळी निवृत्त भारतीय प्रशासकीय सेवा अधिकारी तथा यशदाचे उपसंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानातील विविध गुणांकन निकषांबाबत मार्गदर्शन केले.

पद्मश्री पुरस्कारप्राप्त तथा आदर्श गाव हिवरे बाजारचे प्रवर्तक पोपटराव पवार यांनी दुष्काळी परिस्थितीतही ग्रामपंचायतींनी अभियानात प्रभावी सहभाग कसा घ्यावा, याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. पुरुषोत्तम वायाळ यांनी पाणी अडविण्यासाठी उपयुक्त असलेल्या ‘जलतारा’ शोषखड्ड्यांच्या निर्मिती व जलसंधारण प्रक्रियेविषयी मार्गदर्शन केले.

हिंगोलीतील सर्व ५६३ ग्रामपंचायतींचा सहभाग

हिंगोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी अभियानाच्या अंमलबजावणीचे पीपीटीद्वारे सादरीकरण केले. हिंगोली जिल्ह्यातील ५६३ पैकी ११८ ग्रामपंचायती मागील अभियानात सहभागी झाल्या होत्या. नव्या टप्प्यात जिल्ह्यातील सर्व ५६३ ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर आयुक्त सुषमा देसाई यांनी केले.350

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button