इंडियन ऑईलच्या भूमीगत डिझेल पाइपलाइनला लोखंडी व्हॉल्व्ह बसवून चोरी; 8.50 लाखांचे डिझेल लंपास

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : उपळाई ठोंगे (ता. बार्शी) : येथील शेत गट क्रमांक ८१६ मधून जाणाऱ्या इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या भूमिगत डिझेल पाइपलाइनला लोखंडी व्हॉल्व्ह बसवून अंदाजे ८ लाख ५० हजार रुपये किमतीचे डिझेल चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कंपनीच्या वरिष्ठ ऑपरेशन अँड मेंटेनन्स इंजिनिअरने बार्शी पोलिसांत अज्ञात व्यक्तींविरुद्ध फिर्याद दिली आहे.
याबाबत शुभम भिमा गायकवाड (वय ३२, रा. बाळे, ता. उत्तर सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. ते एप्रिल २०२४ पासून इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या पाकणी येथील कार्यालयात कार्यरत आहेत. ७ ऑक्टोबर २०२६ रोजी पहाटे साडेबारा वाजण्याच्या सुमारास कंपनीच्या भूमिगत पाइपलाइनमधील प्रेशर कमी झाल्याची माहिती कंट्रोल रूमकडून मिळाली. त्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देऊन सुरक्षा कर्मचाऱ्यांना पेट्रोलिंगच्या सूचना देण्यात आल्या.
दरम्यान, ७ ऑक्टोबरच्या रात्री ११.३० ते ८ ऑक्टोबरच्या पहाटे ३ वाजेपर्यंत पुन्हा पाइपलाइनमधील प्रेशर कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे डिझेल चोरीचा संशय व्यक्त करण्यात आला. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी गणेगाव ते पानगाव या पाइपलाइन मार्गावर पोलिसांच्या मदतीने पेट्रोलिंग केले. डीसीव्हीजी मशीनद्वारेही तपासणी करण्यात आली; मात्र सुरुवातीला चोरीचा ठावठिकाणा लागला नाही.
त्यानंतर कंपनीने केलेल्या इनलाईन इन्स्पेक्शन सर्व्हेमध्ये १८ नोव्हेंबर रोजी उपळाई ठोंगे हद्दीतील गट क्रमांक ८१६ मध्ये पाइपलाइनचे नुकसान करून लोखंडी व्हॉल्व्ह बसविल्याचे आढळले. त्यातून अंदाजे ८ लाख ५० हजार रुपयांचे डिझेल चोरी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
विशेष म्हणजे, अतिज्वलनशील डिझेलची चोरी करताना मानवी जीवितास व सार्वजनिक सुरक्षिततेस धोका निर्माण होईल असे कृत्य करण्यात आले आहे. चोरीचे नेमके प्रमाण कंपनीच्या नोंदी तपासल्यानंतर निश्चित होणार असून, या प्रकरणाचा तपास बार्शी पोलीस करीत आहेत.




