अकोलाउद्घाटनमहाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘एज्यू एक्स्पो’ मार्गदर्शक पालकमंत्री आकाश फुंडकर यांचे प्रतिपादन; विदर्भातील पहिल्या भव्य शैक्षणिक व करिअर प्रदर्शनाचा शुभारंभ

B1न्यूज मराठी नेटवर्क500

अकोला : विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी विविध शैक्षणिक क्षेत्रांतील संधींची माहिती मिळावी, तसेच त्यांच्या आवडीनुसार योग्य करिअरची निवड करता यावी, यासाठी ‘एज्यू एक्स्पो’ महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री अॅड. आकाश फुंडकर यांनी केले.

युवा सक्षम फाउंडेशनच्या वतीने आयोजित विदर्भातील पहिल्या भव्य शैक्षणिक व करिअर प्रदर्शन ‘एज्यू एक्स्पो २०२६’चा शुभारंभ उत्साहात पार पडला. श्रीमती राधादेवी गोयनका महिला महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर आयोजित या प्रदर्शनाचे उद्घाटन सोहळ्यात ते बोलत होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार साजिद पठाण आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

विदर्भातील विद्यार्थ्यांना केजी ते पदव्युत्तर शिक्षणापर्यंतच्या विविध संधी, करिअरविषयक मार्गदर्शन आणि रोजगाराच्या संधी एकाच छताखाली उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या तीन दिवसीय प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.500यावेळी बोलताना पालकमंत्री आकाश फुंडकर म्हणाले की, या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या विविध पर्यायांची माहिती मिळणार आहे. विशेषतः इस्रोच्या वतीने साकारण्यात आलेली ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही फिरती प्रयोगशाळा विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान व अवकाश संशोधनाविषयी आवड निर्माण करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. विद्यार्थी व पालकांनी या शैक्षणिक प्रदर्शनाला आवर्जून भेट द्यावी. तसेच १६ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यात जास्तीत जास्त युवक-युवतींनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

खासदार अनुप धोत्रे यांनी ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या शिक्षणाच्या संधींची माहिती मिळणे आवश्यक असल्याचे सांगितले. अशा प्रकारचे उपक्रम विद्यार्थ्यांना योग्य दिशा देण्यास निश्चितच उपयुक्त ठरतील, असेही ते म्हणाले.

आमदार साजिद पठाण यांनी अकोल्यासारख्या शहरात इतक्या भव्य स्तरावर शैक्षणिक प्रदर्शन आयोजित होणे ही विद्यार्थ्यांसह पालकांसाठी महत्त्वाची बाब असल्याचे नमूद केले.500या प्रदर्शनात नामांकित विद्यापीठे, महाविद्यालये, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे तसेच शैक्षणिक कर्ज उपलब्ध करून देणाऱ्या संस्थांचे १२० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन आणि अवकाश संशोधनाविषयी जिज्ञासा निर्माण व्हावी, यासाठी इस्रोची ‘स्पेस ऑन व्हील्स’ ही फिरती प्रयोगशाळा तीनही दिवस विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असणार आहे.

याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), रोबोटिक्स, स्टार्टअप्स आणि संरक्षण क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर तज्ज्ञांची विशेष व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत. तसेच नामांकित कंपन्यांच्या सहभागातून भव्य रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या उद्घाटन सोहळ्याला शहरातील विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी, पालक तसेच युवा सक्षम फाउंडेशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button