उद्घाटननवी दिल्लीमहाराष्ट्र

दिल्लीतील भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यातील महाराष्ट्र दालनाचे उद्योग मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्राच्या उद्यमशीलतेचे 64 स्टॉल्सच्या माध्यमातून प्रदर्शन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

नवी दिल्ली : येथे आयोजित करण्यात आलेल्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा-२०२६ मध्ये महाराष्ट्राच्या औद्योगिक क्षमता, उद्योजकीय कौशल्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडविणाऱ्या भव्य महाराष्ट्र पॅव्हिलियनचे उद्घाटन आज उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भारत मंडपम, प्रगती मैदान येथे झाले. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा महिला बचत गट, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रमातील सहभागी आणि लघुउद्योजकांच्या उलाढालीत दुप्पट ते तिप्पट वाढ अपेक्षित असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

उद्घाटनप्रसंगी उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त तथा सचिव डॉ. श्वेता सिंघल, निवासी आयुक्त ( गुंतवणूक ) सुशील गायकवाड, महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, सहव्यवस्थापकीय संचालक प्रशाली दिघावकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.500उद्घाटनानंतर माध्यमांशी संवाद साधताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, मागील वर्षी भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळ्यात महाराष्ट्रातील महिला बचत गट, ‘एक जिल्हा एक उत्पादन’ उपक्रम आणि लघुउद्योजकांनी सुमारे ७ ते ८ कोटी रुपयांची उलाढाल केली होती. यंदा महाराष्ट्र पॅव्हिलियनला मिळणारा प्रतिसाद आणि सहभागी उद्योजकांची संख्या लक्षात घेता ही उलाढाल दुप्पट ते तिप्पट होण्याची अपेक्षा आहे.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘एक जिल्हा एक उत्पादन’ संकल्पनेनुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील वैशिष्ट्यपूर्ण उत्पादने व्यापक बाजारपेठेत पोहोचविण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. याच उद्देशाने महाराष्ट्र पॅव्हिलियनमध्ये ६४ स्टॉल्स उभारण्यात आले आहेत. या स्टॉल्सच्या माध्यमातून महाराष्ट्रातच उत्पादन करणाऱ्या स्थानिक उद्योजकांना आणि महिला बचत गटांना आपली उत्पादने प्रदर्शित व विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दिल्लीतील मध्यवर्ती भागात असलेल्या सुमारे ५ हजार चौरस फुटांच्या महाराष्ट्र एम्पोरियमच्या नूतनीकरण आणि विस्तारासाठी ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी महाराष्ट्राच्या कला, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडविणारे कायमस्वरूपी दालन तसेच महिला बचत गटांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्र विकसित करण्यात येणार आहे. राज्यातील उद्योजक आणि बचत गटांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता भविष्यात आवश्यकतेनुसार अतिरिक्त प्रदर्शन दालन उपलब्ध करून देण्याचीही शासनाची तयारी असल्याचे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.500

महाराष्ट्राच्या विकास आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन

‘विकास आणि वारसा – महाराष्ट्राचा समृद्ध वारसा, उद्यमशीलता आणि आधुनिक प्रगतीचा संगम’ या संकल्पनेवर महाराष्ट्र पॅव्हिलियनची उभारणी करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या पारंपरिक वाडा वास्तुशैलीवर आधारित या दालनाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा गौरव करणारी शिल्परचना साकारण्यात आली आहे. पारंपरिक दीपमाळ, मावळे आणि तुळशी वृंदावन यांच्या प्रतिकृतींमधून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडते.

दालनामध्ये पैठणी साड्या, कोल्हापुरी चप्पल, सोलापुरी चादरी, हस्तकला, वस्त्रोद्योग, लाकडी खेळणी, बंजारा कला, पारंपरिक धातूकाम, दागिने, मसाले, खादी ग्रामोद्योग तसेच भौगोलिक मानांकन (GI Tag) प्राप्त उत्पादनांचे प्रदर्शन व विक्री करण्यात येत आहे. ‘महाराष्ट्र कनेक्टिव्हिटी हब’ विभागात अटल सेतू, महामार्ग आणि आधुनिक वाहतूक सुविधांची माहिती देण्यात आली आहे. तसेच ‘महाराष्ट्र मानबिंदू’ विभागातून भारतरत्न आणि पद्म पुरस्कारप्राप्त मान्यवरांच्या कार्याचा परिचय करून देण्यात आला आहे.

‘द फोक आख्यान’ सांस्कृतिक कार्यक्रम

महाराष्ट्राच्या समृद्ध लोककला, लोकपरंपरा आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा ‘द फोक आख्यान’ हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम २४ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी ३.३०भारत मंडपम कन्व्हेन्शन सेंटर, प्रगति मैदान, नवी दिल्ली येथील ओपन ॲम्फीथिएटरमध्ये आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दिल्ली व परिसरातील नागरिक, महाराष्ट्रप्रेमी आणि कलारसिकांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button