नक्षलवादाच्या छायेतून विकासाच्या नव्या पर्वाकडे आदिवासी समाजाची वाटचाल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

जनजातीय गौरव दिनानिमित्त गडचिरोलीत ऐतिहासिक राष्ट्रीय सोहळा; प्रधानमंत्र्याच्या हस्ते सुमारे तीन हजार कोटींच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन
B1न्यूज मराठी नेटवर्क
आदिवासी संस्कृती आणि अस्मिता जपत सर्वसमावेशक विकास साधावा – राज्यपाल जिष्णू देव वर्मा
गडचिरोली महाराष्ट्राच्या विकासात पहिला जिल्हा बनेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गडचिरोली, दि. १५ नोव्हेंबर : नक्षलवादी हिंसाचाराच्या प्रभावातून बाहेर पडत देशातील आदिवासीबहुल भाग विकासाच्या नव्या पर्वात प्रवेश करीत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, निवास, रोजगार आणि पायाभूत सुविधांचा विस्तार होत असून आदिवासी समाजाच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडत आहे, असे प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांच्या १५१ व्या जयंतीनिमित्त गडचिरोली येथील जिल्हा क्रीडा संकुलात आयोजित जनजातीय गौरव दिनाच्या राष्ट्रीय सोहळ्यात प्रधानमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते देशभरातील सुमारे तीन हजार कोटी रुपये खर्चाच्या २४६ विकास प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. तसेच महाराष्ट्र, गुजरात आणि तेलंगणा येथील तीन आदिवासी लाभार्थ्यांशी संवाद साधून योजनांमुळे त्यांच्या जीवनात झालेल्या बदलांची माहिती घेतली.
या सोहळ्याला राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्री जुएल ओराम, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री दुर्गादास उईके, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वूईके, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, राज्यसभा सदस्य माया इवनाते, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलिंद नरोटे, माजी खासदार अशोक नेते, केंद्रीय आदिवासी कार्य मंत्रालयाच्या सचिव रंजना चोप्रा यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाल्या.
आदिवासी समाजाच्या गौरवशाली इतिहासाला राष्ट्रीय सन्मान – प्रधानमंत्री
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात ‘जोहार’ या पारंपरिक अभिवादनाने केली. गडचिरोलीतील मोठ्या जनसमुदायाचे आणि आदिवासी संस्कृतीचे कौतुक करत त्यांनी भगवान बिरसा मुंडा यांच्यासह क्रांतिवीर बाबूराव शेडमाके, राघोजी भांगरे, खाज्या नाईक, राणी दुर्गावती, टंट्या भिल्ल आणि अन्य आदिवासी स्वातंत्र्ययोद्ध्यांच्या योगदानाचे स्मरण केले.
नक्षलवादी हिंसाचारामुळे अनेक दशके आदिवासी समाजाच्या विकासात अडथळे निर्माण झाले. मात्र, सुरक्षा यंत्रणांचे प्रयत्न आणि केंद्र व राज्य शासनाच्या विकासाभिमुख धोरणांमुळे परिस्थितीत मोठा बदल होत आहे. पूर्वी हिंसाचाराच्या छायेत असलेल्या भागांमध्ये आता शाळा, रस्ते, आरोग्य सुविधा, उद्योग आणि रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले.
गरिबी निर्मूलनाच्या क्षेत्रात देशाने महत्त्वपूर्ण प्रगती केली असून विकासाच्या प्रक्रियेत मागे राहिलेल्या समाजघटकांना प्राधान्य देण्यात येत आहे. ‘वंचितों को वरीयता’ या धोरणानुसार दुर्गम आदिवासी वस्त्यांपर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविण्यावर भर असल्याचे त्यांनी नमूद केले.
पीएम जनमन आणि धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाच्या माध्यमातून आदिवासी भागांमध्ये पक्की घरे, पिण्याचे पाणी, वीज, रस्ते, आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या राष्ट्रीय सोहळ्यात विविध राज्यांतील एकलव्य आदर्श निवासी शाळा, आश्रमशाळा, वसतिगृहे, आदिवासी संशोधन संस्था आणि बहुउद्देशीय केंद्रांशी संबंधित प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये महाराष्ट्रातील २२ आश्रमशाळा व वसतिगृहांशी संबंधित सुविधांचाही समावेश आहे.
आदिवासी समाजाचा विकास करताना त्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जपणे आवश्यक आहे. ‘विकास आणि विरासत’ या संकल्पनेतून आधुनिक सुविधा आणि पारंपरिक संस्कृती यांची सांगड घालण्यात येत असल्याचे प्रधानमंत्र्यांनी सांगितले. विकसित भारताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे आवाहनही त्यांनी केले.
तीन राज्यांतील आदिवासी लाभार्थ्यांशी पंतप्रधानांचा संवाद
यवतमाळच्या कृष्णा टेकाम यांना पीएम जनमनमधून पक्के घर
महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यातील कोलाम आदिवासी समाजाचे कृष्णा नागोराव टेकाम यांनी प्रधानमंत्री जनमन अभियानातून पक्के घर आणि शौचालय मिळाल्यामुळे कुटुंबाच्या जीवनात झालेला बदल सांगितला. पूर्वी कच्च्या घरात पावसाळ्यात अनेक अडचणी येत होत्या. आता सुरक्षित निवारा उपलब्ध झाला असून गावात पाणी आणि वीज यांसारख्या सुविधाही मिळाल्याचे त्यांनी सांगितले. कोलाम समाजाच्या सांस्कृतिक परंपरांविषयीही प्रधानमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विकासाबरोबरच सांस्कृतिक वारसा जपला जात असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.




