पंढरपूरप्रशासनमहाराष्ट्रयात्रासोलापूर

कार्तिकी यात्रेसाठी पंढरपुरातील अतिक्रमणे हटवून स्वच्छतेला प्राधान्य द्या जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे निर्देश; यात्राकाळात 12 ते 13 लाख भाविक येण्याची शक्यताकार्तिकी यात्रा नियोजनासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे

B1न्यूज मराठी नेटवर्क500

पंढरपूर : कार्तिकी शुद्ध एकादशी शनिवार, दि. 21 नोव्हेंबर रोजी असून, कार्तिकी यात्रा कालावधी 10 ते 24 नोव्हेंबर असा आहे. या कालावधीत सुमारे 12 ते 13 लाख भाविक पंढरपुरात येण्याची शक्यता आहे. यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना वाहतुकीचा कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी शहरातील सर्व अतिक्रमणे हटविण्यासाठी अतिरिक्त पथके नियुक्त करावीत. तसेच चंद्रभागा वाळवंट, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसरासह संपूर्ण शहराच्या स्वच्छतेला प्राधान्य द्यावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी दिले.

कार्तिकी यात्रा नियोजनाच्या अनुषंगाने श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास येथे आयोजित आढावा बैठकीत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी अपर पोलीस अधीक्षक प्रेरणा कट्टे, प्रांताधिकारी सचिन इथापे, उपविभागीय पोलीस अधिकारी सिताराम डुबल, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव, कार्यकारी अभियंता अमित निमकर, तहसीलदार सचिन लंगुटे, जिल्हा नगर प्रशासन अधिकारी आशिष लोकरे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एकनाथ बोधले, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पंकज कुंभार, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.500यात्रा कालावधीत भाविकांना मुबलक व शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासह शहरातील स्वच्छतेची योग्य व्यवस्था करावी. अनधिकृत होर्डिंग तातडीने हटवावेत. वाहनतळांच्या ठिकाणी मुरमीकरण करून पुरेशी प्रकाशव्यवस्था करावी. सार्वजनिक स्वच्छतागृहांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र कर्मचारी नियुक्त करावेत. भक्तिसागर येथे वारकरी व भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी नगरपालिका प्रशासनाला दिल्या.

मंदिर समितीने दर्शनरांगेतील बॅरिकेडिंग सुस्थितीत ठेवावे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी जर्मन हँगर उभारून त्यामध्ये पिण्याचे पाणी, भोजन, सुलभ शौचालये आणि मॅटची व्यवस्था करावी. आरोग्य विभागाने पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवून अतिरिक्त खाटांची व्यवस्था करावी, तसेच आरोग्यदूतांची नियुक्ती करावी, असे निर्देशही त्यांनी दिले. वाखरी येथे यात्राकाळात मोठ्या प्रमाणात जनावरांचा बाजार भरत असल्याने पशुवैद्यकीय विभागाने स्वतंत्र पथक नियुक्त करून जनावरांचे लसीकरण, औषधोपचार तसेच जनावरे आणि पशुपालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, असेही त्यांनी सांगितले.500चौपाळा ते शिवाजी चौक या दरम्यान रिक्षांची गर्दी होऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. त्यामुळे प्रादेशिक परिवहन विभागाने तातडीने आवश्यक कारवाई करावी. अन्न व औषध प्रशासनाने स्वतंत्र पथके नियुक्त करून शहरातील तसेच परिसरातील खाद्यपदार्थ विक्री केंद्रे आणि दूध विक्री केंद्रांची तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर तातडीने कारवाई करावी. सरगम चौकातील राष्ट्रीय महामार्गाचे सुरू असलेले काम वाहतुकीस अडथळा ठरणार नाही, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आवश्यक उपाययोजना कराव्यात. महावितरणने अखंडित व सुरक्षित वीजपुरवठा करावा. भाविकांसाठी उपलब्ध असलेल्या गॅस वितरण केंद्रांवर अग्निशमन यंत्रणा सज्ज ठेवावी. राज्य परिवहन विभागाने बसस्थानकात शुद्ध पिण्याचे पाणी व नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, तसेच दगडी पुलावर तात्पुरते बॅरिकेडिंग करावे, अशा सूचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्या.500यावेळी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी श्रीकांत यादव यांनी मंदिर समितीच्या वतीने दर्शनरांग व दर्शनमंडप येथे भाविकांसाठी करण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची माहिती दिली. नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी नगरपरिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या व्यवस्थेची माहिती सादर केली.

बैठकीत पाटबंधारे विभाग, राज्य परिवहन विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पंचायत समिती, कृषी उत्पन्न बाजार समिती आदी विभागांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. कार्तिकी यात्रा सुरळीत, सुरक्षित आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी यावेळी दिले.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button