बार्शी नगरपरिषदेतील संर्वग अधिकारी स्थानिक लिपीक शिपाई सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस द्या!

B1न्यूज मराठी नेटवर्क
बार्शी : बार्शी नगरपरिषदेतील संवर्ग अधिकारी, स्थानिक लिपिक, शिपाई कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी सणानिमित्त बोनस अथवा सानुग्रह अनुदान मंजूर करावे, अशी मागणी सोलापूर जिल्हा नगरपरिषद, नगरपंचायती कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत समितीने बार्शी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. तेजस्विनीताई कथले व मुख्याधिकारी तैमूर मुलाणी यांना लेखी निवेदन दिले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, बार्शी नगरपरिषदेमधील संवर्ग अधिकारी, स्थानिक लिपिक, शिपाई तसेच सफाई कर्मचारी विविध विभागांमध्ये आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडत आहेत. नगरपरिषदेच्या प्रशासकीय कामकाजापासून ते शहरातील स्वच्छता, आरोग्य, पाणीपुरवठा व इतर नागरी सुविधा सुरळीत ठेवण्यासाठी कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत असतात. विशेषतः सफाई कर्मचारी प्रतिकूल परिस्थितीतही शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असतात.
दिवाळी हा आनंदाचा व उत्साहाचा सण असून प्रत्येक कर्मचाऱ्याला आपल्या कुटुंबासमवेत आनंदाने सण साजरा करता यावा, यासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असते. त्यामुळे नगरपरिषदेतील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिवाळीनिमित्त बोनस अथवा सानुग्रह अनुदान मंजूर करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा. तसेच यासाठी आवश्यक प्रशासकीय व आर्थिक तरतूद करून कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनसचा लाभ मिळवून द्यावा, अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनाची माहिती विधान परिषद सदस्य आमदार राजाभाऊ राऊत यांनाही देण्यात आली आहे.




