दोन महिन्यांत ग्रामीण रुग्णालय व अप्पर तहसीलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन; समाधान पवार यांचे उपोषण मागे…..

B1न्यूज मराठी नेटवर्क
वैराग : वैराग शहर आणि परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते समाधान पवार यांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सुरू केलेले आमरण उपोषण आज अखेर मागे घेतले. पंचायत समितीचे उपसभापती संतोष निंबाळकर आणि मकरंद निंबाळकर यांनी उपोषणस्थळी भेट देऊन पवार यांच्याशी चर्चा केली. यावेळी येत्या दोन महिन्यांत ग्रामीण रुग्णालय आणि अप्पर तहसील कार्यालयाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर समाधान पवार यांनी आपले उपोषण स्थगित केले.
वैरागच्या विकासाचा आणि तालुका निर्मितीचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. कै. आमदार चंद्रकांत नाना निंबाळकर तसेच धन्यकुमार अण्णा भुमकर यांनी आपल्या कार्यकाळात वैरागच्या विकासासाठी आणि तालुका निर्मितीसाठी वेळोवेळी प्रयत्न केले होते. मात्र, अद्याप हा प्रश्न मार्गी लागलेला नाही. सध्या सामाजिक कार्यकर्ते अमरराजे निंबाळकर, निरंजन भुमकर आणि समाधान पवार यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मागण्यांसाठी शासन व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.
वारंवार निवेदने देऊन आणि पाठपुरावा करूनही मागण्यांबाबत ठोस निर्णय होत नसल्याने समाधान पवार यांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला होता. वैराग शहरासह परिसरातील गावांना मूलभूत सुविधा मिळाव्यात आणि विकासाचे रखडलेले प्रश्न मार्गी लागावेत, या उद्देशाने त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाकडे सुरुवातीला प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुरेसे लक्ष दिले नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत होती. मात्र, आज लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट देऊन चर्चा केली. ग्रामीण रुग्णालय आणि अप्पर तहसील कार्यालयाच्या मागण्यांबाबत दोन महिन्यांत सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.
समाधान पवार यांच्या प्रमुख मागण्या
१) वैराग येथे ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात यावे. २) वैराग येथे अप्पर तहसील कार्यालयाची निर्मिती करण्यात यावी. ३) बंद अवस्थेत असलेला संतनाथ सहकारी साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा. ४) वैराग तालुका निर्मितीचा प्रश्न तातडीने मार्गी लावून तालुक्याची अधिकृत घोषणा करण्यात यावी.
वैराग तालुका निर्मितीचा प्रश्न हा केवळ एका व्यक्तीचा किंवा संघटनेचा नसून वैरागसह परिसरातील अनेक गावांच्या विकासाशी निगडित आहे. त्यामुळे दोन महिन्यांत ग्रामीण रुग्णालय आणि अप्पर तहसील कार्यालयाबाबत दिलेल्या आश्वासनाची पूर्तता होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे. तसेच संतनाथ सहकारी साखर कारखाना सुरू करणे आणि वैराग तालुका निर्मिती या मागण्यांबाबतही शासनाने ठोस निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.




