सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतून जिल्ह्यात जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविणार – मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन

वॉटर कप स्पर्धा १०० गुणाचे असून यातील ७० गुण जलसंधारण कामांना तर ३० गुण गट शेतीला राहतील, गावांची निवड आणि प्रशिक्षणार्थींच्या निवडीला प्राधान्य देण्याच्या सूचना
B1न्यूज मराठी नेटवर्क
सोलापूर, दि. २ : सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२६-२७ च्या माध्यमातून लोकसहभाग आणि श्रमदानातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमासाठी पाणी फाउंडेशनला जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांच्या माध्यमातून आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल. जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांनी या स्पर्धेत सहभागी होऊन जलसंधारणाची कामे श्रमदानातून पूर्ण करावीत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी केले.
सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा २०२६-२७ च्या अनुषंगाने जिल्ह्यात लोकसहभागातून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे राबविण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या उपस्थितीत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांची जिल्हास्तरीय बैठक घेण्यात आली.
यावेळी पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ, राज्य समन्वयक सत्यवान देशमुख, जिल्हा समन्वयक सुशांत गायकवाड, उपजिल्हाधिकारी रोहयो अंजली मरोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले, मृद व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक लांडगे, उपअभियंता रामचंद्र क्षीरसागर, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे वरिष्ठ भूवैज्ञानिक मुस्ताक शेख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. सर्व गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता जलसंधारणाच्या कामांसाठी पाणी फाउंडेशनने पुढाकार घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व शासकीय यंत्रणांनी समन्वयाने काम करून या उपक्रमाला गती द्यावी. गावपातळीवर ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग मिळवून श्रमदानातून जलसंधारणाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाचे पूर्णपणे सहकार्य राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गावांची निवड आणि प्रशिक्षणार्थींची निवड महत्त्वाची; डॉ. अविनाश पोळ यांचे प्रतिपादन
यावेळी पाणी फाउंडेशनचे राज्य मार्गदर्शक डॉ. अविनाश पोळ यांनी सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचे स्वरूप, स्पर्धेतील निकष आणि जलसंधारणासाठी करावयाच्या विविध कामांची सविस्तर माहिती दिली. या स्पर्धेत जलसंधारणाच्या कामांना ७० टक्के, तर गट शेती या निकषांना ३० टक्के असे एकूण १०० गुणांचे मूल्यमापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या स्पर्धेसाठी गावांची निवड तसेच गावातील पाणी आणि जलसंधारणाविषयी जागरूक असलेल्या नागरिकांची प्रशिक्षणार्थी म्हणून निवड करणे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे संबंधित गटविकास अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी यांनी गावांची तसेच प्रशिक्षणासाठी योग्य नागरिकांची निवड अत्यंत काळजीपूर्वक व योग्य पद्धतीने करावी. गावाच्या जलसंधारण चळवळीत मनापासून योगदान देण्याची धडपड आणि इच्छाशक्ती असलेल्या नागरिकांना पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण डिसेंबर २०२६ अखेर किंवा १५ जानेवारी २०२७ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.
गावाच्या जलसंधारण चळवळीला दिशा देण्यासाठी प्रशिक्षणार्थींची योग्य निवड हा महत्त्वपूर्ण घटक आहे. त्याचबरोबर प्रशिक्षणानंतर गावातील शिवार फेरीलाही विशेष प्राधान्य देण्यात येणार आहे. शिवार फेरीच्या माध्यमातून गावातील पाण्याचे स्रोत, पाणलोट क्षेत्र, पाण्याचा प्रवाह आणि जलसंधारणासाठी आवश्यक असलेल्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन करणे शक्य होईल, असे डॉ. पोळ यांनी स्पष्ट केले.
पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून सन २०१६ पासून महाराष्ट्रात जलसंधारणाची कामे लोकसहभागातून आणि श्रमदानाच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. आजपर्यंत राज्यातील ७६ तालुक्यांमध्ये जलसंधारणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. ग्रामस्थांना एकत्रित करून गावपातळीवर जलसंधारणाची चळवळ उभी करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यल्प असून दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर जलसंधारणाच्या कामांची आवश्यकता आहे. या पार्श्वभूमीवर वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गावांनी सहभागी व्हावे. केवळ स्पर्धेपुरते मर्यादित न राहता गावातील पाण्याची उपलब्धता वाढविण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्वांचे सहकार्य आणि सामाजिक बांधिलकी महत्त्वाची आहे. शासन, प्रशासन आणि ग्रामस्थ एकत्रित आले, तर जलसंधारणाची ही चळवळ निश्चितच यशस्वी होईल. यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकजुटीने श्रमदान करून आपली गावे पाणीदार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन डॉ. पोळ यांनी केले.
प्रारंभी पाणी फाउंडेशनचे जिल्हा समन्वयक सुशांत गायकवाड यांनी फाउंडेशनच्या कामकाजाची आणि जलसंधारण उपक्रमांची माहिती दिली. या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरावरील सर्व शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय साधण्याची जबाबदारी उपजिल्हाधिकारी अंजली मरोड यांच्याकडे नोडल अधिकारी म्हणून सोपविण्यात आली आहे.




