महाराष्ट्रसोलापूर

सापटणे येथे श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची उभारणीभूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या अधिकारी व ग्रामस्थांचा जलसंवर्धनासाठी पुढाकार; लोकसहभागातून जलचळवळ उभारण्याचे आवाहन

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : पावसाचे पाणी अडवून जमिनीत मुरविणे, भूजल पातळीत वाढ करणे आणि गावातील पाणीपुरवठ्याचे स्रोत सक्षम करण्याच्या उद्देशाने भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा (जीएसडीए), सोलापूर कार्यालय आणि सापटणे (टें.), ता. माढा येथील ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने वनराई बंधारा उभारणीचा श्रमदान उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमातून जलसंवर्धनासाठी लोकसहभागाचे महत्त्व तसेच इतरांसमोर एक आदर्श सापटणे ग्रामस्थांनी ठेवला आहे, अशी माहिती भोजनचे वरिष्ठ भू वैज्ञानिक डॉ. मुस्ताक शेख यांनी दिली आहे.
सोलापूर जिल्ह्याला पर्जन्यमानातील अनिश्चितता आणि पाणीटंचाईच्या समस्यांना वारंवार सामोरे जावे लागते. पावसाळ्यात उपलब्ध होणारे पाणी वाहून जाण्याऐवजी त्याचे स्थानिक पातळीवर संचयन करून भूजल पुनर्भरण करणे आवश्यक आहे. याच उद्देशाने सापटणे येथे लोकसहभागातून वनराई बंधारा उभारण्यात आला.

या उपक्रमांतर्गत सिमेंटच्या रिकाम्या गोण्यांमध्ये वाळू व माती भरून त्यांची योग्य रचनेत मांडणी करत वनराई बंधारा बांधण्यात आला. स्थानिक पातळीवर उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून कमी खर्चात प्रभावी जलसंधारणाची कामे करता येतात, हे या उपक्रमातून दाखवून देण्यात आले. विशेष म्हणजे, ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदान करून जलसंवर्धनाच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.

वनराई बंधाऱ्यामुळे पाण्याचा प्रवाह व वेग नियंत्रित होण्यास तसेच पाणी जमिनीत मुरण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होण्यास मदत होते. परिणामी, योग्य भौगोलिक व भूजलशास्त्रीय परिस्थितीत अशा बंधाऱ्यांमुळे स्थानिक भूजल पुनर्भरणाला चालना मिळू शकते. सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहिरींच्या पाणलोट क्षेत्रात अशा प्रकारची जलसंधारणाची कामे केल्यास गावाच्या जलसुरक्षेला बळकटी मिळू शकते.500
गावातील सार्वजनिक विहिरींच्या परिसरातील नैसर्गिक नाले, ओढे आणि पाण्याच्या प्रवाहांचा अभ्यास करून योग्य ठिकाणी वनराई बंधारे उभारणे आवश्यक आहे. त्यासाठी भूगर्भीय परिस्थिती, पाण्याच्या प्रवाहाची दिशा आणि आवश्यक तांत्रिक निकषांचा विचार करणे गरजेचे असल्याचे या उपक्रमातून स्पष्ट करण्यात आले.

महाराष्ट्रातील गावांना लोकसहभागातून जलसंवर्धनाची चळवळ उभारण्याचे आवाहन

सापटणे येथील हा उपक्रम महाराष्ट्रातील इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो. जलसंधारणासाठी केवळ शासकीय निधी व यंत्रणेवर अवलंबून न राहता ग्रामपंचायत, शेतकरी, महिला बचत गट, युवक मंडळे आणि ग्रामस्थांनी एकत्र येऊन श्रमदानातून जलसंवर्धनाची लोकचळवळ उभारावी, असे आवाहन करण्यात आले.

पाण्याची समस्या ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक गावाची आणि नागरिकांची सामूहिक जबाबदारी आहे. सापटणे येथील ग्रामस्थांनी प्रत्यक्ष श्रमदानातून हा संदेश दिला आहे. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी अशा लोकसहभागातून राबविण्यात येणाऱ्या जलसंधारणाच्या उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले.

माढा तालुक्यातील सापटणे येथे ३१ ऑक्टोबर रोजी आयोजित या उपक्रमात वरिष्ठ भूवैज्ञानिक डॉ. मुश्ताक शेख, सहाय्यक भूवैज्ञानिक डॉ. संजय साबळे, संतोष पाटील, विनायक निंबाळकर, डॉ. फरजाना बिराजदार, कनिष्ठ भूवैज्ञानिक एम. डी. नदाफ, अनिता बनसोडे व विशाल चौधरी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button