आरोग्यमहाराष्ट्रसोलापूर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात मानसिक आरोग्य विषयावर चर्चासत्र संपन्न

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सामाजिक शास्त्र संकुलातील मानसशास्त्र विभाग आणि माइंड हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने 22 ऑक्टोबर रोजी मानसिक आरोग्य: शांततापूर्ण जीवनाचा मार्ग या महत्त्वपूर्ण विषयावर चर्चासत्राचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉ. गौतम कांबळे आणि मानसशास्त्र विभागाचे प्रभारी विभागप्रमुख डॉ. प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्रा. विष्णू खडाखडे आणि पाहुण्यांची ओळख डॉ. हजीमलंग शेख यांनी करुन दिली.

पहिल्या सत्रात प्रमुख वक्त्या डॉ. स्वाती कोरके म्हणाल्या, आपण थोडासा शारीरिक त्रास झाला तरी लगेच डॉक्टरांकडे धाव घेतो, परंतु मन जेव्हा थकते, उद्विग्न होते किंवा सतत नकारात्मक विचारांच्या गर्तेत अडकते, तेव्हा आपण त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतो. हीच दुर्लक्षाची प्रवृत्ती पुढे गंभीर मानसिक आजारांना निमंत्रण देते. मानसिक आरोग्य जपण्यासाठी सकारात्मक विचारसरणी, कामाच्या व्यापातून मिळवलेली नियमित विश्रांती, आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या भावनांचे योग्य व्यवस्थापन करण्यावर त्यांनी विशेष भर दिला.
दुसर्‍या सत्रात डॉ. अनिल गोडबोले यांनी समुपदेशन आणि मानसिक आरोग्यात तरुणांची भूमिका या विषयावर अत्यंत सखोल आणि प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

यावेळी डॉ. गोडबोले म्हणाले की, आजचा तरुण वर्ग हा एका मोठ्या संक्रमणावस्थेतून जात आहे. करिअरची चिंता, अभ्यासाचे वाढते ओझे, नातेसंबंधांतील गुंतागुंत, सोशल मीडियावरील आभासी जग आणि कौटुंबिक अपेक्षांच्या ओझ्याखाली युवा पिढी अनेकदा मानसिक दबावाखाली येते. अशा वेळी हा दबाव आतल्या आत साठवून ठेवण्याऐवजी, योग्य वेळी तज्ज्ञांचे समुपदेशन घेणे अत्यंत फायदेशीर ठरते.500समुपदेशन घेणे हा कमकुवतपणा नसून ती स्वतःला सावरण्याची आणि प्रगल्भ होण्याची एक धाडसी कृती आहे, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे पटवून दिले. तरुणांनी केवळ स्वतःच्याच मानसिक आरोग्याची काळजी घेऊ नये, तर आपल्या मित्रपरिवारात, कुटुंबात किंवा समाजात कोणी मानसिक संघर्षातून जात असेल, तर त्यांनाही मदतीचा हात दिला पाहिजे. युवक हे समाजात मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी सर्वात मोठे आणि प्रभावी माध्यम ठरू शकतात.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे म्हणाले, विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्त्व, समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि त्याचे मानसिक संतुलन सुदृढ असणे तितकेच महत्त्वाचे आहे. आजचे विद्यार्थी हे उद्याचे नेतृत्व आहेत. जर त्यांचे मनच शांत आणि स्थिर नसेल, तर ते उत्तम समाज कसा घडवतील? त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासासोबतच त्यांच्या मानसिक आरोग्यासाठीही नेहमीच कटिबद्ध राहील. भविष्यातही उपयोजित मानसशास्त्र विभागाच्या माध्यमातून अशा प्रकारची शिबिरे आणि समुपदेशन केंद्रे अधिक सक्षमपणे राबविण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी डॉ. प्रभाकर कोळेकर म्हणाले, आजच्या पिढीला केवळ शैक्षणिक ज्ञानाचीच नव्हे, तर भावनिक बुद्धिमत्तेची आणि मानसिक स्थैर्याची नितांत गरज आहे. उपयोजित मानसशास्त्र विभागाचा हा नेहमीच प्रयत्न राहिला आहे की, पुस्तकी ज्ञानासोबतच व्यावहारिक जीवनातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम करावे. आजचे हे चर्चासत्र त्याच दिशेने टाकलेले एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्वेता हुल्ले यांनी केले. तर आभार स्वप्नील सोनवणे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमाला संकुलातील प्राध्यापक, विद्यार्थी आणि कर्मचारी मोठ्या संखेने उपस्थित होते.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button