महाराष्ट्रसोलापूर

महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियानात सहभागी होण्याचे आवाहन, सांगोला तहसील कार्यालयात ३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर दरम्यान तडजोडनामे सादर करता येणार

B1न्यूज मराठी नेटवर्क500

सोलापूर, दि. 21 : महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित प्रलंबित महसुली दावे आपापसातील सहमतीने जलदगतीने निकाली काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत ‘महात्मा जोतिराव फुले महसूल लोक अदालत अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत सांगोला तहसील कार्यालयात प्रलंबित प्रकरणांतील पक्षकारांनी तडजोडनामा तयार करून ३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत सादर करावेत, असे आवाहन तहसीलदार बाळुताई भागवत यांनी केले आहे.

महसूल प्रशासनातील अर्धन्यायिक न्यायालयांमध्ये जमिनीशी संबंधित अनेक महसुली दावे दीर्घकाळ प्रलंबित असतात. या प्रकरणांचा निकाल लागण्यास वर्षानुवर्षे वेळ लागत असल्याने संबंधित पक्षकारांचा वेळ आणि पैसा खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने या अभियानाला मान्यता दिली आहे.500महसूल व वन विभागाच्या दि. १३ ऑगस्ट २०२६ रोजीच्या शासन निर्णयानुसार, दि. १ सप्टेंबर २०२६ ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत हे अभियान राबविण्यात येत आहे. प्रलंबित महसुली प्रकरणे पक्षकारांच्या आपापसातील सहमतीने आणि तडजोडीच्या माध्यमातून जलदगतीने निकाली काढणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

दसरा आणि दिवाळीच्या सणांच्या सुट्ट्यांचा कालावधी वगळून, पक्षकारांना सुनावणी व कार्यालयीन कामकाजासाठी उपस्थित राहणे सोयीचे व्हावे, यासाठी सोलापूर जिल्ह्यात पुढील तीन महिन्यांचा कालबद्ध कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.

त्यानुसार, सांगोला तहसील कार्यालयात अर्धन्यायिक स्वरूपाची प्रकरणे प्रलंबित असलेल्या पक्षकारांनी शासन निर्णयात नमूद केलेल्या तरतुदींनुसार तडजोडनामा तयार करून संबंधित प्रकरणनिहाय मंडळ अधिकारी कार्यालय किंवा तहसील कार्यालय, सांगोला येथे दि. ३ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०२६ या कालावधीत सादर करावा. प्रलंबित महसुली प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्याची संधी उपलब्ध करून देणाऱ्या या अभियानाचा संबंधित पक्षकारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन सांगोला तहसीलदार श्रीमती बाळुताई भागवत यांनी केले आहे.500

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button